पुणे : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आराखड्यानुसार मंजूर असलेली सर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत. तसेच नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा समग्र आराखडा करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना केली.

तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग, वनविभागाचे संबंधित अधिकारी, मंदिर देवस्थानाचे पदाधिकारी, बांधकाम विकासक यावेळी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकासांतर्गत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वढू बुद्रुक आणि तुळापूर, मालोजी राजे भोसले यांची गढी तसेच हजरत चाँदशहवली बाबा दरगाह, श्री क्षेत्र जेजुरी गड, सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधी स्थळ, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करणे आणि श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या सर्व आराखड्यांच्या विकासकामांची माहिती यावेळी डुडी यांनी घेतली.

ते म्हणाले की, तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासंदर्भात मंदिर ट्रस्ट, संस्थान येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मदत घेऊन कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. स्थानिक पातळीवर काही अडचणी असतील त्या प्रशासनातर्फे सोडण्यात येतील. काही ठिकाणी जमीन संपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून, येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र सर्वांत चांगले तीर्थक्षेत्र तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा, असेही डुडी यांनी सांगितले. ‘पर्यटनाच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम आदी बाबींचा समावेश या विकास आराखड्यात करून पुढील दहा दिवसांत आराखडा प्रशासनाकडे सादर करावा.’ अशा सूचना डुडी यांनी दिल्या.