लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बारामती विमानतळावरून विमान प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीचे पुन्हा एक विमान रविवारी सकाळी कटफळ हद्दीत कोसळले. पडताना हे विमान उलट कोसळलेले आहे. साधारण चार दिवसांपूर्वी याच कंपनीचे विमान कटफळनजीक एका शेतामध्ये कोसळले होते. एकाच आठवड्यात विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.
बारामती विमानतळावरून विमानाचे प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड कंपनीचे शिकाऊ विमान रविवारी सकाळी सातच्या दरम्यान कटफळ या ठिकाणी एका शेतात कोसळले. हे विमान कशामुळे कोसळले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सातत्याने विमान कोसळणे हा प्रकार निश्चित धोकादायक मानला जात आहे.
रेड बर्ड कंपनीचे विमान कटफळ येथील जुन्या सह्याद्री काऊ फॉर्म नजीक लोखंडे वस्तीच्या जवळ सकाळी सात वाजता अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. व्हीटी आरबिटी, टेक्नम या जातीचे दोन सीटर रेड बर्ड कंपनीचे विमान अचानक कोसळून अपघातग्रस्त झाले. या विमानातील वैमानिक हा किरकोळ जखमी झाला असून वारंवार कोसळलेले विमानाच्या अपघातामुळे कटफळ नजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे.
रेड बर्ड कंपनीचे एक विमान चार दिवसापूर्वी विमानतळानजीक कटफळ येथील एका शेतात कोसळले होते. या अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, तर यातील वैमानिक किरकोळ जखमी झाला होता. या पूर्वी बारामतीजवळील नीरा नदीच्या गोखळी पुलाजवळ शिकाऊ विमान चालकाकडून विमान नदीत कोसळलेले होते. तर २०१९ मध्ये झालेल्या या अपघातात दोघेजण जखमी झाले होते आणि विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नदीत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांनी विमानचालकाचे प्राण वाचवले होते. ही घटना राज्यभर गाजली होती.
चार दिवसापूर्वी रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात शक्ती सिंग हा वैमानिक किरकोळ जखमी झाला होता. कटफळनजीक झालेल्या शेतात हे विमान कोसळून विमानाचे मोठे नुकसान झाले होते. कटफळ रेल्वे स्थानकाजवळ बारामती- दौंड लोहमार्गाच्या आसपास असलेल्या शेतात विमान अपघाताचे प्रमाण वाढले असून, ही बाब निश्चित चिंताजनक आहे. विमान नेमक्या कोणत्या कारणासाठी कोसळले जात आहे, यामागील कारणे शोधण्याची खरी गरज आहे. दरम्यान, सतत विमान कोसळण्याच्या घटनेने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.