गणेश यादव, लोकसत्ता
पिंपरी: महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात आलेला तारांगण प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. काम पूर्ण होऊनही हा प्रकल्प बंद अवस्थेत असल्याने आकाशगंगा पाहण्याच्या आनंदापासून नागरिक वंचित आहेत.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम मार्च २०१८ रोजी सुरू करण्यात आले होते. टोकिओ, जपान येथील ठेकेदाराने काम केले आहे. ११ कोटी १२ लाख ४३ हजार रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
आणखी वाचा- मुठा डाव्या कालव्यावरील रस्त्याचे ६० लाख रुपये भाडे थकले
वातानुकूलित असणाऱ्या या तारांगणात १५० जणांसाठी बैठक व्यवस्था, तसेच १०० बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे. याशिवाय, पुस्तक दालनाचाही समावेश आहे. हे तारांगण १५ मीटर व्यासाचे व गोलाकार असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात आले आहे. यामध्ये डीजिटल स्वरूपाचे तारांगण दाखवण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे विविध लहान-मोठे तारे स्पष्टपणे पाहता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य आणि विद्युत विषयांचा, तर दुसऱ्या टप्प्यात तारांगणासाठी आवश्यक प्रोजेक्टर, डोम आदी कामांचा समावेश आहे.
आणखी वाचा- पुणे: कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत १२५ टन कचऱ्याचे संकलन
शालेय विद्यार्थ्यांसाठी तारामंडळ, ग्रह, तारे यांची माहिती मिळण्यासाठी व्हीडिओ-ऑडिओ चित्रफिती दाखविल्या जाणार असून त्यांचा कालावधी ३० मिनिटांचा आहे. खगोलशास्त्रीय माहिती देणारे २४ प्रदर्शनीय फलक बसविण्यात येणार आहेत.
प्रकल्प सायन्स पार्क चालविणार
तारांगण हा प्रकल्प पिंपरी – चिंचवड सायन्स पार्क यांना चालविण्यास देण्यात येणार आहे. सायन्स पार्कच्या संचालक मंडळावर महापालिका आयुक्त अध्यक्ष आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञ हे संचालक आहेत. त्यासाठी या संस्थेबरोबर २९ वर्षांचा करार करण्यात येणार आहे.
तारांगण प्रकल्पात १५ मीटर व्यासाचा अर्धगोलाकृती डोम उभारण्यात आला आहे. या माध्यमातून आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे पाहता येणार आहेत. आकाश दर्शन करत असल्याचा नागरिकांना अनुभव येणार आहे. एकाचवेळी १२० नागरिक हे डोम पाहू शकतात. -श्यामसुंदर बनसोडे, कनिष्ठ अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका