पुणे : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने तरुणीने प्रियकराशी संगनमत करुन नियोजित पतीला जिवे मारण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी यवत पोलिसांनी प्रियकरासह साथीदारांना गजाआड केले असून, नियोजित पतीचा खुनाचा प्रयत्न करणारी तरुणी पसार झाली आहे.

आदित्य शंकर दांगडे (वय १९), संदीप दादा गावडे (वय ४०, दोघे रा. गुघल वडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), शिवाजी रामदास जरे (वय ३२), इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७, दोघे रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), सूरज दिगंबर जाधव (वय ३६, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती पसार झाली आहे. याबाबत एका तरुणाने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय तरुण बाणेर भागातील एका हाॅटेलमध्ये शेफ आहे. तक्रारदार तरुणाचा तरुणीशी विवाह ठरला होता. १२ मार्च रोजी त्यांचा विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. २२ फेब्रुवारी रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एकाने संपर्क साधला. ‘तरुणीशीविवाह करुन नको. आम्ही विवाह करणार आहोत. विवाह केल्यास गंभीर परिणाम होतील,’ अशी धमकी तरुणाला देण्यात आली होती. त्यानंतर तरुणाने या घटनेची माहिती तरुणी, तिच्या मोठ्या भावाला दिली. त्यानंतर तरुणीने ‘माझे कोणाशी प्रेमप्रकरण नाही. वाटले तर तुम्ही चौकशी करू शकता’, असे सांगितले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी तरुणीने त्याला चित्रपट पाहण्यासाठी बोलावून घेतले. हडपसर भागातील एका चित्रपटगृहात दोघांनी चित्रपट पाहिला.

तरुणाने तिला खामगाव फाटा येथे तिच्या नातेवाईकांकडे सोडले. तेथून तरुण मोटारीतून पुण्याकडे परतत होता. खामगाव फाट्याजवळ आरोपींनी मोटार अडवली. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ‘लग्नात कसा उभा राहतो’, अशी धमकी देऊन आरोपी मोटारीतून पसार झाले. जखमी अवस्थेतील तरुणीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने १ मार्च रोजी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी ज्या मोटारीतून पसार झाले होते. त्या मोटारीचा क्रमांक त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आदित्य दांगडे याला ताब्यात घेतले. तरुणी आणि तिचा प्रियकर संदीप गावडे यांनी तरुणाला जिवे मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती आदित्यने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन पाच जणांना अटक केली.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक महेश माने, आदी अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली.