पुणे : उन्हाळी सुटीच्या निमित्ताने काश्मीर सहलीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात आरक्षण झाले होते. मात्र, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

काश्मीरमधील पहलगाम, बैसरन, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल, चिंकारा अशा आकर्षक पर्यटनस्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून पसंती दिली जाते. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक प्राधान्याने काश्मीरच्या सहलीचे नियोजन करतात. खासगी पर्यटन कंपन्यांकडून हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवास असे पर्याय आणि विशेष सवलती देऊन निरनिराळ्या सहली आयोजित केल्या जातात. गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील पर्यटनाला चांगली चालनाही मिळाली आहे. मात्र, आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटनाला पुन्हा फटका बसू शकतो, असे चित्र आहे.

याबाबत वीणा वर्ल्ड कंपनीच्या संचालक वीणा पाटील म्हणाल्या, ‘गेल्या सहा-सात वर्षांपासून पर्यटकांमध्ये काश्मीरचे आकर्षण वाढले आहे. सध्या तेथे ३२ सहली तेथे आहेत. पहलगामधील दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, नियोजित सहलींवर परिणाम झाला आहे. बुधवारी दिवसभरात काश्मीर सहलींचे ३५ टक्के आरक्षण रद्द झाले आहे. भूकंप, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे अशा अडचणी आल्या, तरी काश्मीरमधील परिस्थिती लवकर पूर्ववत होते. मात्र, पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमधील भीती जाण्यास कालावधी लागेल.’

‘काश्मीरला जाणाऱ्या पुढील आठवडाभराच्या सहली नियोजित आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत १० ते २० टक्के सहली रद्द झाल्या आहेत. सद्य:स्थितीत तेथे असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे. पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून सुस्थितीत विमानतळापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. इतकेच नाही, तर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भयभीत पर्यटकांना काश्मीरमधील स्थानिकांकडूनही घरांमध्ये सुरक्षित ठेवून माणुसकी दाखविण्यात आली आहे,’ अशी माहिती केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी दिली.

सेवा क्षेत्रालाही फटका

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रवासी वाहतूक कंपन्यांना फटका बसल्याने हवाई कंपन्या, हाॅटेल्स, स्थानिक वाहतूक व्यावसायिक, पर्यटनावर अवलंबून काश्मीरमधील स्थानिक व्यावसायिक आणि इतरांवरही आर्थिक परिणाम झाला आहे. उन्हाळी सहलींच्या सत्रात मुंबईहून श्रीनगरला जाण्यासाठी विमानप्रवासाचे शुल्क २० ते २५ हजार रुपये असताना बुधवारपासून केवळ चार हजार रुपये प्रवासी शुल्क झाले असल्याचे विमान कंपन्यांच्या ऑनलाइन संकेतस्थळावर दिसून आले.

दोन कोटी पर्यटकांची भेट

पर्यटकांमध्ये काश्मीरचे आकर्षण वाढत आहे. गेल्या वर्षभरात दोन कोटी ११ लाख ८० हजार पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिल्याची माहिती जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाने प्रसिद्ध केली आहे.

काश्मीरमधील स्थानिक नागरिकांची उपजीविका पर्यटकांवर अवलंबून आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दहशतवाद्यांचा मूळ हेतू साध्य करू द्यायचा नसेल, तर पर्यटकांनी घाबरून न जाता काश्मीर किंवा पहलगामशेजारील पर्यटन क्षेत्रांना प्राधान्य द्यावे. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. – झेलम चौबळ, संचालक, केसरी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

भारतीय सैन्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. पर्यटकांनी नियोजित आरक्षण रद्द करू नये. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल. – वीणा पाटील, संचालिका, वीणा वर्ल्ड