पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीकडून बुधवारी (३० ऑगस्ट) जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दैनंदिन गाड्यांपेक्षा ९६ अधिक गाड्या मार्गांवर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.रक्षाबंधनानिमित्त दर वर्षी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. पीएमपीकडून दैनंदिन एक हजार ८३७ गाड्यांद्वारे सेवा दिली जाते. त्यामध्ये ९६ जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी १ हजार ९३३ गाड्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.
कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगाव, राजगुरूनगर आणि देहूगाव या भागांत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी चालक, वाहक तसेच पर्यवेक्षकीय सेवकांची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे. महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, अधिकारी, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांचीही प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकांवर आणि थांब्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे.