सध्याचा हंगाम वृक्षारोपणांच्या कार्यक्रमांचा आहे. अनेक संस्था आणि महापालिका देखील शहराभोवतीच्या टेकडय़ांवर वृक्षारोपणाचे कितीतरी कार्यक्रम घेतात. लावलेल्या या झाडांच्या संगोपनाची मात्र काहीच व्यवस्था नसते. दोन वर्षांपूर्वी कात्रज पासून वीस किलोमीटरवर असलेल्या होळकरवाडी गावातील टेकडय़ांवरही असेच वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, त्या वृक्षारोपणाचे वेगळेपण हे की या टेकडीवर आता तब्बल तेरा हजार झाडे जगवण्यात आली आहेत आणि त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपनही केले जात आहे.
होळकरवाडीच्या चहूबाजूंनी साडेसहाशे एकर गायरान जमीन आहे आणि तीन मोठय़ा डोंगराच्या कुशीत हे गाव वसले आहे. या उघडय़ा बोडक्या डोंगरांवर आणि खडकाळ अशा ३२ एकर क्षेत्रावर वृक्षारोपणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथे पहिला वृक्षारोपणाचा कार्यक्रम ८ जुलै २०१२ रोजी झाला. त्या वर्षी सात हजार झाडे लावण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ८ जुलै रोजी आणखी साडेसहा हजार झाडे लावण्यात आली. या मुरमाड डोंगरावर आता पिंपळ, आवळा, कडुलिंब, वड, चिंच, कवठ, सीताफळ, आंबा ही आणि अशी विविध प्रकारची तेरा हजार झाडे छान जगली आहेत आणि ती वाढतही आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चालवल्या जात असलेल्या या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे संस्थेचे पाचशे सदस्य या झाडांची जोपासना करतात. त्यासाठी गुरुवार आणि रविवार हे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. गावाचे सरपंच रवींद्र झांबरे यांचीही या उपक्रमाला सुरुवातीपासून सर्व ती मदत झाली आहे.
या कामाला सुरुवात झाली तेव्हा पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्या वेळी टँकर आणून डोंगरांवर रांगा करून ते पाणी वाहून नेले जात असे आणि नंतर ते झाडांना दिले जात असे. त्यासाठी सदस्य टँकर पासून साखळी करून पाणी वाहून नेत. त्यानंतर आता श्रमदान करून डोंगरांवर छोटी तळी करण्यात आली आहेत. त्यात टँकरचे पाणी टाकले जाते आणि ते पाणी सदस्य कॅनमधून एकेका झाडाला देतात. याशिवाय आठवडाभर ओल टिकून राहावी म्हणून सलाइनच्या बाटल्यांचा वापर करून त्याद्वारेही पाणी देण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. प्रत्येक रोपापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी सदस्य अतिशय परिश्रम घेतात आणि सर्व काम स्वेच्छेने करतात. त्यामुळेच गावाच्या बाजूचे बोडके डोंगर आता हिरवे होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 वृक्षसंगोपनाचा हा उपक्रम यशस्वी झाला आहेच, शिवाय आता महापालिकेच्या साहाय्यातून तळजाई डोंगरावरही प्रतिष्ठानतर्फे दहा हजार झाडांच्या संगोपनाचा उपक्रम ८ जुलै रोजी सुरू केला जाणार आहे.
योगेश फडतरे, प्रमुख वृक्षारोपण, संगोपन मोहीम
——————–
वृक्षारोपण उपक्रमाची वैशिष्टय़े
लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन
प्रत्येक झाडाला क्रमांक, त्याचा ठरलेला पालक
श्रमाला विशेष महत्त्व, सर्व कामे सदस्यांमार्फतच
दर गुरुवार व रविवारी मिळून पाचशे जणांचे श्रमदान
झाडांसाठी कॅन, सलाइनच्या बाटल्यांद्वारे पाणी