मुठा नदीच्या कडेला असलेले गवत काढून निर्मिलेल्या शिवपार्वती उद्यानामध्ये गुरुवारी आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या वैद्य प. य. ऊर्फ दादा खडीवाले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने नदीसुधार कार्यक्रमांतर्गत श्रमदान करून हा उपक्रम राबविला आहे.
ओंकारेश्वर मंदिराजवळील अण्णासाहेब पटवर्धन समाधीसमोरील जागेत नदीपात्राच्या कडेला पाच हजार चौरस फूट जागेवरील काँग्रेस गवत उपटून घेणे हा पहिला टप्पा खडीवाले यांनी गेल्या गुरुवारी (३ सप्टेंबर) पार पाडला. बालकांपासून ते ८५ वर्षांचे श. ह. भिडे यांच्यासह शंभरजणांनी श्रमदानातून एक ट्रक कचरा उपसून हा परिसर स्वच्छ केला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट उपस्थित या वेळी होत्या. या जागेला तात्पुरते तारेचे कुंपण घालून त्यांनी या जागेवर छोटेखानी उद्यान विकसित केले आहे. या परिसरामध्ये गुरुवारी सकाळच्या दीड तासात अडुळसा, कुडा, कांडवेल, तुळस, धोत्रा, बांबू, वड, गोरखचिंच अशा पन्नासहून अधिक आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेविका मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होत्या.
वैद्य खडीवाले म्हणाले, की नदीला माता म्हणून संबोधणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये मुठा नदीची गटारगंगा करणे हे शोभणारे नाही. ही व्यथा लोकप्रतिनिधीच्या कानावर घातली. केंद्राकडून येणाऱ्या निधीची वाट पाहत असल्याचे या नेत्याने सांगितले. मात्र, कार्यकर्त्यांची फळी घेऊन नदीलगतचा काही भाग गवतमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सव काळात नागरिकांनी या छोटय़ाशा उद्यानात पुन्हा कचरा टाकू नये. गणेशोत्सवानंतर सध्याच्या जागेएवढय़ाच जागेवर हाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने नदीकाठचा परिसर स्वच्छ करून नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी छोटी उद्याने विकसित करावी.

Story img Loader