केंद्र सरकारतर्फे ‘प्लॅस्टिक कचरामुक्त शहर’ या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शहरामध्ये शंभर ते दीडशे ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र (प्लॅस्टिक कलेक्शन सेंटर) सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे टोल फ्री हेल्पनाईन कार्यान्वित करण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना आपल्या घराजवळचे केंद्र नेमके कोठे आहे हे कळण्यास मदत होणार आहे.
‘प्लॅस्टिक कचरामुक्त शहर’ या अभियानाचा १३ फेब्रुवारीपासून पुण्यातून प्रारंभ होत आहे. त्या संदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी ही माहिती दिली.
कुणाल कुमार म्हणाले, शहरामध्ये दररोज १६०० टन कचरा संकलित होतो. त्यापैकी ९ ते १२ टक्के म्हणजेच १२० ते १५० टन कचरा हा प्लॅस्टिकचा असतो. प्लॅस्टिक कचरा बऱ्यापैकी गोळा करून तो पुनर्वापरासाठी दिला जातो. ४० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिक निर्मितीवर बंदी आहे. मात्र, अशा पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या आणि प्लॅस्टिक कचरा करणाऱ्यांना तिप्पट रकमेचा दंड आकारला जातो. महापालिकेने १८ लाख रुपयांपर्यंतचा दंड आतापर्यंत आकारला आहे. या दंडामुळे काही लोकांमध्ये प्रबोधन झाले आहे, तर काही लोक दंड भरतात.
नागरिकांचे ठिय्या आंदोलन
या बैठकीला हजेरी लावल्यामुळे कुणाल कुमार यांना लोकशाही दिन कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. आयुक्त नसल्यामुळे नागरिकांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्या संदर्भात विचारले असता कुणाल कुमार म्हणाले, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बोलावलेली बैठक ही शहराच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यास उपस्थित राहावे लागल्याने लोकशाही दिन कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. मात्र, लोकशाही दिन कार्यक्रमात येणाऱ्या तक्रारींचे लवकरच निराकरण केले जाईल.

बीआरटीला वाघोली येथील नागरिकांचा विरोध होत आहे. मात्र, बीआरटी मार्ग चांगला झाल्यास वाघोलीच्या लोकांनाच त्याचा फायदा होणार आहे. या संदर्भात मी तेथील सरपंच आणि जिल्हा परिषद अध्यक्षांशीही चर्चा केली आहे. बीआरटीसाठी जागा घेतली जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे. ही जागा ग्रामपंचायतीची नाही तर, सरकारची आहे. अडीच एकर जागेची मागणी केली तर फारसे नुकसान होणार नाही. उलट वाघोलीकरांना चांगली वाहतूक सेवा मिळेल.
– कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

Story img Loader