‘प्लेटलेट’ या रक्तघटकाची आवश्यकता भासल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी पळापळ आणि वापरलेल्या प्लेटलेट्सच्या बदली रक्तपेढीला प्लेटलेट दाता गाठून देताना येणारे नाकी नऊ यावर जनकल्याण रक्तपेढीने प्रभावी उपाय शोधला आहे. केवळ प्लेटलेट्स दान करणाऱ्या दात्यांचा वेगळा गट या रक्तपेढीने तयार केला असून गेल्या वर्षभरात या गटाने दान केलेल्या प्लेटलेट्सचा ३०० रुग्णांना फायदा झाला आहे.
फेब्रुवारी २०१३ मध्ये रक्तपेढीने हा गट सुरू केला. सध्या या गटात १५० प्लेटलेट दाते असून ते नियमितपणे व रुग्णाच्या गरजेनुसारही प्लेटलेट दान करतात. दात्याच्या रक्तातील केवळ प्लेटलेट हा रक्तघटक विशिष्ट उपकरणाच्या साहाय्याने वेगळा काढून इतर रक्तघटक दात्याच्या शरीरात परत पाठवण्याच्या प्रक्रियेस ‘अफेरेसिस’ असे म्हणतात. प्लेटलेट दात्यांच्या या गटाने गेल्या वर्षभरात ३०० अफेरेसिस प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘रक्तदानाच्या प्रक्रियेस फारसा वेळ लागत नसला तरी केवळ प्लेटलेट दान करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. दात्याला त्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ राखून ठेवावा लागतो. असे असूनही स्वेच्छा प्लेटलेट दात्यांच्या गटास चांगला प्रतिसाद मिळाला. काढून घेतलेले प्लेटलेट्स रक्तपेढीत पाच दिवस साठवून ठेवता येतात. परंतु या रक्तघटकाला असलेली मागणीही मोठी असते. या गटामुळे प्लेटलेटची मागणी आल्यावर केव्हाही ते उपलब्ध होऊ शकतात. गेल्या वर्षभरात रुग्णांच्या नातेवाईकांकडे बदली प्लेटलेटसाठी मागणीही करावी लागलेली नाही.’’
प्लेटलेट्सची गरज कुणाला?
कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना शरीरातील प्लेटलेट काऊंट कमी झाल्यास प्लेटलेटची गरज भासते. डेंग्यूसारख्या आजारातही प्लेटलेट काऊंट कमी होत असल्यामुळे रुग्णाला प्लेटलेट्स देणे आवश्यक ठरते.
प्लेटलेट दान कुणी आणि किती वेळा करावे
दात्याचा प्लेटलेट काऊंट चांगला असणे आवश्यक असते. (उदा. १.५ ते २ लाख पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड). प्लेटलेट्स काढण्याची प्रक्रिया अधिक वेळ चालत असल्यामुळे तसेच आधी रक्त काढणे आणि प्लेटलेट वेगळे केल्यानंतर उर्वरित रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडणे या गोष्टी सहन करण्यासाठी दात्याची रक्तवाहिनी पुरेशी मजबूत असावी लागते. प्लेटलेट दान एका महिन्यात दोन वेळा करता येऊ शकते. प्लेटलेट दान करण्यापूर्वी आवश्यक त्या रक्तचाचण्या केल्या जातात. प्लेटलेट काढून घेण्यासाठी वापरले जाणारे किट महाग असल्यामुळे हे प्लेटलेट्स कोणत्याही कारणास्तव नंतर वाया जाऊ नयेत यासाठी या चाचण्या आवश्यक ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा