कलेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात शुक्रवारी प्रेक्षकांच्या अश्लिल शेरेबाजीमुळे नाटकाचा प्रयोग थांबविण्याची वेळ आली. शुक्रवारी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात बार कौन्सिलच्या सदस्यांसाठी ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही प्रेक्षकांकडून नाटकातील संवांदांवर वारंवार अश्लिल शेरेबाजीला करण्यात येत होती. त्यामुळे नाटकात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर या कलाकारांना प्रयोग सादर करण्यात अडथळा येत होता. सुरूवातीला दोघांनीही या शेरेबाजीकडे दुर्लक्ष केले. मात्र, हा प्रकार सहन होण्याच्या पलीकडे गेल्यानंतर दोन्ही कलाकारांनी नाटकाचा प्रयोग थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चिन्मय आणि मधुरा यांनी आयोजकांकडे धाव घेतली असता, आयोजकांनी नाटकादरम्यान असे प्रकार होतच असतात, असे सांगत कानावर हात ठेवले. आयोजकांच्या मध्यस्थीनंतर नाईलाजाने नाटकाचा उर्वरित प्रयोग सादर झाला असला तरी कलाकारांनी या प्रकाराविषयी गंभीर नाराजी व्यक्त केली. बार कौन्सिलचे सदस्य असणाऱ्या सुशिक्षित वकीलांकडून अशाप्रकारच्या वर्तनाची अपेक्षा नव्हती, असे मधुरा वेलणकर यांनी सांगितले. तर, चिन्मय मांडलेकरने फेसबुकवरून आपला उद्वेग व्यक्त करताना आपल्या देशात शिक्षण आणि सुसंस्कृतपणाचा काहीही संबंध नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचे म्हटले. यासंदर्भात बार कौन्सिलच्या पदाधिकारी किंवा सदस्यांकडून अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 
chinju1

Story img Loader