‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पं. सदाशिवबुवा जाधव यांच्याकडून चंद्रशेखर गाडगीळ यांनी किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या गायन कलेचा श्रीगणेशा केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम आपल्या गायन कलेने गाजविले. ‘लागा चुनरीमें दाग’ हे मन्ना डे यांचे लोकप्रिय गीत गाडगीळ समरसून गात असत. या गाण्यानेच त्यांना ‘ब्रेक’ दिला. गायिका रश्मी यांच्यासमवेत त्यांनी ‘रश्मी ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली. ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून त्यांना चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी दिली. व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली ‘निसर्गराजा ऐक सांगतो’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही गीते लोकप्रिय झाली. ‘अरे कोंडला कोंडला देव’, ‘अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत’, ‘अजून आठवे ती रात्र पावसाळी’ ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत.
‘दुख सुख की हर एक माला कुदरत ही पिरोती है’ हे ‘कुदरत’ चित्रपटातील शीर्षक गीत संगीतकार आर. डी. बर्मन यांनी चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात स्वरबद्ध केले होते. ‘दूर जाऊनी जाशी कुठवर या धरतीला सीमा आहे जाशील तेथे हेच ऐकशील सर्वस्वी मी तुझाच आहे’ हे गीत प्रेमिकेला उद्देशून असले तरी चंद्रशेखर गाडगीळ यांनी रसिकांना उद्देशूनच म्हटले आहे. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर आधारित गाडगीळ यांनी सादर केलेला ‘कांचन संध्या’ हा कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरला होता. पुण्यातील ऑर्केस्ट्रा कलाकारांतर्फे शनिवारी (४ ऑक्टोबर) टिळक स्मारक मंदिर सेमिनार हॉल येथे गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन
रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playback singer chandrashekhar gadgil is no more