‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पं. सदाशिवबुवा जाधव यांच्याकडून चंद्रशेखर गाडगीळ यांनी किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या गायन कलेचा श्रीगणेशा केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम आपल्या गायन कलेने गाजविले. ‘लागा चुनरीमें दाग’ हे मन्ना डे यांचे लोकप्रिय गीत गाडगीळ समरसून गात असत. या गाण्यानेच त्यांना ‘ब्रेक’ दिला. गायिका रश्मी यांच्यासमवेत त्यांनी ‘रश्मी ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली. ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून त्यांना चित्रपटासाठी पाश्र्वगायनाची संधी दिली. व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली ‘निसर्गराजा ऐक सांगतो’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही गीते लोकप्रिय झाली. ‘अरे कोंडला कोंडला देव’, ‘अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत’, ‘अजून आठवे ती रात्र पावसाळी’ ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा