मैफलीमध्ये कलाकार हा ‘एन्टरटेनर’ असतो. त्यामुळे मैफलीमध्ये रसिकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे हे त्याचे कर्तव्य असते. हे खरे असले तरी कलाकारासाठी संगीताचा आनंद वैयक्तिक असतो, असे मत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी व्यक्त केले. माझ्यातील कलाकार सदैव जागा असतो. त्यामुळे माझ्यातील कलाकार हा निर्माता या भूमिकेवर कधी मात करीत नाही, असेही त्यांनी सांगितले.
अक्षर मानव आणि इमेज मीडिया यांच्यातर्फे आयोजित ‘गप्पा’ या कार्यक्रमात कवी-गजलकार वैभव जोशी यांनी राहुल देशपांडे यांच्याशी संवाद साधला. कर्तृत्व असूनही आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांना ज्या गोष्टी मिळू शकल्या नाहीत, त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशातूनच ‘वसंतोत्सव’ सुरू केल्याचे सांगून राहुल देशपांडे यांनी वसंतराव आणि बेगम अख्तर यांच्यातील ऋणानुबंध उलगडला.
राहुल देशपांडे म्हणाले, गेल्या तीनचार वर्षांत पुण्यामध्ये महोत्सवांची लाट आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही शिक्का नसलेला असा ‘वसंतोत्सव’ करण्याचा प्रयत्न आहे. संगीताच्या सर्व प्रकारांचा समावेश करून रसिकांपर्यंत सादर करण्याच्या या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. एरवी स्वत:साठी काहीही न मागणाऱ्या नाना पाटेकर यांनी केवळ माझ्यासाठी म्हणून सर्वतोपरी मदत केली. नव्या पिढीला संगीत नाटकांची गोडी लागावी यासाठी निर्माता झालो. पण, त्यामागे ‘वसंतोत्सव’मध्ये झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या उद्देश होता हे वास्तव आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकामध्ये पद सादर करताना हे नाटक आहे याचे भान ठेवले. त्यामुळे नाटकामध्ये बंदिशीसारखे नाटकामध्ये गाता येणार नाही हा कटाक्ष ठेवला. मैफलीमध्ये देखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी कधीच गायलो नाही.