घरातील नळाच्या दुरुस्तीची कामे करावयाची असतील आणि त्यासाठी प्लंबरला दूरध्वनी केल्यावर दारात एखादी महिला उभी राहिली तर दचकून जाऊ नका, किंवा आश्चर्य देखील वाटून घेण्याचे कारण नाही. आजवर केवळ मुलांसाठीच असलेल्या प्लम्बिंग या व्यवसायाचे दालन आता मुलींसाठी खुले होत आहे.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मुली या मुलांच्या बरोबरीने काम करीत आहेत. केवळ मुलांसाठी असलेल्या अनेक प्रांतामध्ये मुलींनी केवळ प्रवेश केला असे नाही, तर त्या प्रांतामध्ये शिखर गाठण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हे ध्यानात घेऊन आतापर्यंत केवळ मुलांसाठीच असलेले एक दालन ते म्हणजे प्लम्बिंग हा अभ्यासक्रम आता मुलींसाठी देखील सुरू होत आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट आणि ज्ञानदा प्रतिष्ठान संचालित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आंत्रपुनियर डेव्हलपमेंट रिसर्च (आयआयईडीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि मुलींसाठी प्लम्बिंग अभ्यासक्रम सुरू होत आहे. या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून उत्तीर्ण विद्यार्थिनींना ‘आएपीएमओ’ (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लम्बिंग अॅन्ड मेकॅनिकल ऑफिशियल्स) या संस्थेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि किमान नववी उत्तीर्ण असलेल्या मुली आणि महिलांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी ६० दिवसांचा असून त्यापैकी २० दिवस थिअरी आणि २० दिवस प्रत्यक्ष कामावरील प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. शेवटच्या २० दिवसांत वाघोली येथील प्लम्बिंग युनिटमध्ये निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयआयडीईडीआरचे संचालक सुभाष इनामदार यांनी या अभ्यासक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे.
भविष्यातील व्यवसायाच्या संधी :
– प्लम्बिंग सुपरवायझर म्हणून नोकरी
– नामवंत बांधकाम व्यावसायिकांकडे नोकरी
– सोसायटय़ांमधील प्लम्बिंग दुरुस्ती आणि देखभालीची कामे
– एम्प्लॉयमेंट ब्यूरोसारखे नोकरी देण्याचे काम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा