पंतप्रधानांच्या हस्ते ११,२४० कोटींच्या कामांचे लोकार्पण

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे अधिक जोमाने वाहू लागले असतानाच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ हजार २४० कोटींच्या काही प्रकल्पांचे लोकार्पण तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. पुण्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्यप्रणालीमार्फत उपस्थित होते. या वेळी यापूर्वीच्या सरकारची जुनी कार्यपद्धती आणि मानसिकतेमुळे शहरांचा विकास खुंटल्याची टीका करतानाच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारमुळे विकासाला गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray : “गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५००?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर-मेट्रो या भुयारी मार्गाचे लोकार्पण तसेच स्वारगेट-कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. पुण्यातील भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, सोलापूर विमानतळ, बिडकीन औद्याोगिक क्षेत्र अशा ११ हजार २४० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. या वेळी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पुण्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता शहरासाठी यापूर्वीच मेट्रोची आवश्यकता होती, असा दावा केला. यापूर्वीच्या सरकारकडे नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. सातत्यामध्ये कोणताही अडथळा आला की राज्याचे नुकसान होते. पुण्यासह राज्यातील अन्य शहरांबाबत हाच प्रकार घडला. मात्र ‘विकसित महाराष्ट्र विकसित भारत’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भविष्याच्या दृष्टीने पायाभूत सेवा-सुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे राज्याच्या हिताचे आहे. समाजात बदल घडविण्याची जबाबदारी महिलेकडे येते तेव्हा कशी क्रांती होते, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून देशाने पाहिले आहे. मात्र, महिलांबाबतही यापूर्वीच्या सरकारची मानसिकता चुकीची होती. पायाभूत सुविधांअभावी मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. सैनिक शाळा, लष्करात मुलींना प्रवेश नव्हता. गरोदरपणाची सुट्टीही महिलांना मिळत नव्हती. ही जुनी मानसिकता भाजप सरकारने पूर्णपणे बदलली आहे. सर्व क्षेत्रात महिलांना संधी देत देशाच्या विकासाचे दरवाजे उघडले असल्याचे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> सोलापूर विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महायुतीच्या दहाही आमदारांची पाठ

महायुतीच्या आमदारांची कार्यक्रमाकडे पाठ

सोलापूर : सोलापूर विमानतळाचे लोकार्पण सोहळ्याकडे भाजप आमदार सुभाष देशमुख वगळता महायुतीच्या अन्य दहा आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विमानतळावर करण्यात आले. या वेळी देशमुख आणि सोलापूरचे माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील अकलूजमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी गेले होते. विजयकुमार देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, राम सातपुते हे भाजपचे आमदार, बबनराव शिंदे , संजय शिंदे , यशवंत माने हे अजित पवार गटाचे आमदार, भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील या सर्वांनी लोकार्पण सोहळ्याला दांडी मारली.

राज्यात अन्य पक्षांचे सरकार असताना पुण्यासह राज्यातील शहरांचा विकास खुंटला होता. मेट्रो, बुलेट ट्रेन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि सिंचन क्षेत्रातील अनेक प्रकल्प रखडले. राज्यात शिंदे यांचे ‘डबल इंजिन’ सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान