PM Modi Pune Visit Update : पुणेरी मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे ‘ब्रेक’ लागला आहे. वाहतूक पोलिसांनी आदेश दिल्याने मेट्रोचे काम २७ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. याआधी जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीमुळे जून महिन्यात आणि नंतर बॅरिकेडिंग परवानगी नसल्यामुळे अर्धा जुलै महिना काम बंद होते. आता मोदींच्या दौऱ्यामुळे काम पुन्हा रखडणार आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी एवढे दिवस काम बंद का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि टाटा मेट्रो प्रोजेक्टसला याबाबत २१ जुलैला पत्र पाठविले होते. परंतु, मेट्रोचे काम सुरूच होते. त्यामुळे त्यांनी २६ जुलैला पीएमआरडीएला पत्र पाठविले. त्यानंतर २७ जुलैपासून गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रोचे काम थांबविण्यात आले आहे. यामुळे पुणे विद्यापीठ चौक ते वेधशाळा (सिमला ऑफीस) चौकादरम्यानचे काम बंद आहे. याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे कार्यालय आणि पोलीस मुख्यालयासमोरील बॅरिकेड काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण गणेशखिंड रस्त्यावरील बॅरिकेड आतमध्ये घेण्यास वाहतूक पोलिसांनी बजावले आहे. मोदी या मार्गाने जाणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे काम थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा – “पंतप्रधानांनी पुणेऐवजी मणिपूरला जावे”, रविंद्र धंगेकरांचा सल्ला; काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला जून महिन्यात जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीमुळे विलंब झाला होता. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडिंगला परवानगी न दिल्याने काम बंद ठेवण्यात आले होते. जी-२० परिषदेनंतरही वाहतूक पोलिसांनी मेट्रोला बॅरिकेडिंगला परवानगी दिली नव्हती. बॅरिकेडिंगची रुंदी कमी करण्याची सूचना पोलिसांनी केली होती. या वादात काम रखडले होते. त्यात अर्धा जुलै महिना काम बंद होते. अखेर मेट्रोने बॅरिकेडिंगची रुंदी कमी करण्यास होकार दिल्यानंतर उपायुक्त मगर यांनी मेट्रोला नवीन बॅरिकेडिंग करून काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. आता पुन्हा मोदींच्या दौऱ्यामुळे काम सहा दिवस बंद राहणार आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात मध्यभागाला छावणीचे स्वरूप; चौकाचौकांत बंदोबस्त

काम पूर्ण होण्याचा कालावधी लांबणार

हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग २३ किलोमीटरचा आहे. एका बाजूला मोदींच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्घाटन तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच दौऱ्यामुळे पुणेरी मेट्रोचे काम बंद ठेवण्यात आले आहे. मेट्रोचे काम जून महिन्यापासून रखडले असून, काम पूर्ण होण्याच्या कालावधीवर परिणाम होऊ शकतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi pune visit metro work stops due to pm modi visit to pune pune print news stj 05 ssb