PM Modi Pune Visit Updates, 26 September 2024 : पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (२६ सप्टेंबर) एस.पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होते. मात्र पुण्यात कालपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आज उद्घाटनानंतर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार होता. पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांच्या लोकार्पणासह मोदी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची पहिली कन्याशाळा ज्या भिडेवाड्यात भरवली जात होती, तिथे उभारल्या जाणाऱ्या स्मारकाची पायभरणी करणार होते, मात्र या लोकार्पण व पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी पुणेकरां थोडी वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. तसेच आज सकाळपासून शहरातील अनेक भागात पावसाने सुरुवात केली आहे. आज पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एस.पी. कॉलेजच्या मैदानावर कार्यक्रम होण्याची शक्यता कमी वर्तवली जात होती. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे की मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘ससून’मधील गोंधळानंतर राज्य सरकार सावध! वैद्यकीय अधीक्षकपदाचे निकष बदलण्याची पावले
पुण्यातील वाहतुकीत बदल
मोदींच्या या पुणे दौऱ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले होते. दुपारी ३ वाजल्यापासून मोदींचा ताफा परत जाईपर्यंत वाहतूक निर्बंध लागू केले जाणार होते. कार्यक्रम स्थळाच्या आसपासच्या १३ रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. सावरकर पुतळा ते सासरबाग चौक दुपारी वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार होता, त्याऐवजी मित्रमंडळ चौकातून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.
हे ही वाचा >> पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना उद्या मुसळधार पावसाचा इशाऱ्यामुळे सुट्टी
मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दुसर्या पर्यायाचा वापर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्या दृष्टीने स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे प्रशासनामार्फत कार्यक्रमाची तयारी केली जात होती. मात्र अचानक मोदींचा दौरा रद्द झाल्याचं आयोजकांना कळवण्यात आलं आहे.