पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा समाजामध्ये आरक्षणावरून भाजपविरोधात जनमत तयार झाल्याची जोरदार चर्चा आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातील खराडी येथे जाहीर सभा घेतली होती. तसेच मुंबईकडे जाताना त्यांनी पुण्यात मुक्कामही केला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना वारंवार विविध विकासकामांच्या भूमीपूजन, लोकार्पण कार्यक्रमासाठी राज्यात पाचारण करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी नुकतेच मुंबई, नाशिक, सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत.
हेही वाचा >>> हवाई प्रवाशांचे हाल संपेनात! पुणे विमानतळावर रोजचा गोंधळ सुरूच; अनेक विमाने रद्द
आता श्री शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे दिल्लीतून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे प्रयाण करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्धाटन आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग विभागाच्या वतीने पुण्यात तीन दिवसीय प्रदर्शन मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे. दर दोन वर्षांनी देशातील प्रमुख शहरामध्ये हे प्रदर्शन भरवले जाते. यापूर्वीचे प्रदर्शन गुजरातमधील अहमदाबाद शहरात आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती लावावी, अशी विनंती राज्य सरकारकडून पंतप्रधान कार्यालयाला करण्यात आली आहे.