पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात १५ हजार कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण केलं आहे. पुणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आणि तरुणांचं स्वप्न पूर्ण करणारे शहर आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी कर्नाटक आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “बंगळुरू आयटी हब असून जागतिक गुंतवणूकीचं केंद्र आहे. अशावेळी कर्नाटक आणि बंगळुरूचा विकास होण्याची गरज होती. पण, ज्या प्रकारच्या घोषणा करू कर्नाटकात सरकार बनवण्यात आलं. त्याचे दुष्परिणाम सगळा देश पाहतोय. एखादा पक्ष आपल्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी रिकामी करतो. याचे नुकसान राज्यातील जनतेला भोगावे लागतात.”
“पक्षांचे सरकार बनत असते, पण लोकांचे भविष्य धोक्यात घातले जाते. बंगळुरू आणि राज्याच्या विकासासाठी पैसे नाहीत, असं कर्नाटक सरकार स्वत:हा सांगत आहेत. ही देशासाठी चिंताजनक बातमी आहे,” असं पंतप्रधानांनी म्हटलं.
“राजस्थान राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. राज्यात विकासकामे ठप्प पडली आहेत,” अशी टीकाही पंतप्रधानांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकावर केली आहे.
“२०१४ च्या पूर्वीच्या सरकारने शहरांत गरीबांना घरे देण्यासाठी दोन योजना तयार केल्या. त्याअंतर्गत देशात ८ लाख घरे बनवली गेली. या घरांची स्थिती एवढी वाईट होती की लोकांनी ते घेण्यास नकार दिला. झोपडीत राहणारा व्यक्ती घर नाकारत असेल, तर त्याची स्थिती किती वाईट असेल? महाराष्ट्रातही ५० हजारांहून अधिक घरे पडून राहिली,” असे पंतप्रधानांनी सांगितलं.