पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट ( शिवाजी नगर ) या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासह विविध १५ हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि अन्य मंत्री उपस्थित होते. त्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदींनी पुणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणार शहर असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पुणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आणि तरुणांचं स्वप्न पूर्ण करणारे शहर आहे. पुण्यातील १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आलं. हजारो कुटुंबांना घरे मिळाली आहेत. यासाठी मी पुण्यातील नागरिकांचे अभिनंदन करतो.”
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण; म्हणाले, “पुणे शहर देशाच्या…”
“पुणे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे. जेव्हा नागरिकांचे जीवनमान उंचावते तेव्हा शहराचा विकास आणखी गतीने होत असतो. पुण्यात पाच वर्षाच्या कालावधीत २४ किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरु झाली आहे. देशातील शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था बळकट करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या मेट्रो मार्गिकांचा विस्तार केला जातोय,” असं मोदींनी सांगितलं.
हेही वाचा : “सरदार पटेल म्हणाले, मी राजीनामा देईन, पण लोकमान्य टिळकांचा पुतळा…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा
“२०१४ पर्यंत देशात २५० किलोमीटरच मेट्रो मार्गिका होती. आता देशात ८०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो मार्गिका सुरु झाली आहे. याशिवाय १ हजार किलोमीटरपेक्षा अधिकच्या नव्या मेट्रो मार्गिकांचे कामही सुरु आहे. २०१४ साली फक्त ५ शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आता देशातील २० शहरांत मेट्रो धावत आहे,” असं मोदींनी म्हटलं.