पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळी मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे.
या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे.
आपलयाकडे महत्त्वाच्या योजना पूर्ण व्हायला देखील फार वेळ लागायचा. या सुस्त वृत्तीमुळे देशाचं मोठं नुकसान झालं. आता आपल्याला वेगाने काम करायला हवं. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लान बनवला आहे. सरकार, मंत्रालयांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे अनेक वर्षांनंतर एखादी योजना जरी पूर्ण झाली, तरी ती आऊटडेटेड झालेली असते. पीएम गतिशक्ती मास्टर प्लान यावरच काम करेल.
नद्या जर पुन्हा जिवंत झाल्या, तर शहरातल्या लोकांना देखील दिलासा मिळेल. शहरातल्या लोकांनी वर्षातला एक दिवस निश्चित करून नदी उत्सव साजरा करायला हवा. संपूर्ण शहरात नदी उत्वसाचं वातावरण निर्माण करायला हवं. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या नद्यांचं महत्त्व समजेल.
मध्यमवर्गातील लोकांना घरासाठी रेरा कायदा फार मोठी मदत करतो - नरेंद्र मोदी
ही भूमी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची आहे. काही महिन्यांपूर्वी यांच्या पालखी मार्गांचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला मिळालं आहे.
माझं पुणे आणि अशा इतर शहरांना आवाहन आहे जिथे मेट्रोचं काम सुरू आहे. समाजात जे मोठे लोक म्हटले जातात, त्यांना माझा आग्रह राहील, की आपण कितीही मोठे असलो, तरी मेट्रोमधून प्रवास करण्याची सवय समाजातल्या प्रत्येक वर्गाला असायला हवी.
२०१४पर्यंत फक्त दिल्लीमध्येच मेट्रोचं जाळं होतं. एखाद-दुसऱ्या शहरात मेट्रोचं काम सुरू होत होतं. आज दोन डझन शहरात मेट्रो एकतर चालू झाली आहे, किंवा होणार आहे. यात महाराष्ट्राचं देखील योगदान आहे. महाराष्ट्रात मेट्रोच्या जाळ्याचा वेगाने विस्तार आहे.
असं म्हणतात, की २०३०पर्यंत आपली शहरी लोकसंख्या ६० कोटींहून जास्त असेल. शहरांची वाढती लोकसंख्या आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येते. मात्र, त्यासोबतच आव्हानं देखील असतात. शहरांमध्ये एका निश्चित सीमेमध्येच उड्डाणपुलं होऊ शकतात. किती उड्डाणपुलं बांधाल, कुठे कुठे बांधाल, किती रस्त्यांचं रुंदीकरण आणि कुठे कुठे कराल? अशात आपल्याकडे एकच पर्याय आहे. मास ट्रान्सपोटेशन. अशा व्यवस्थांची जास्तीत जास्त उभारणी व्हायला हवी. यासाठी आमचं सरकार अशा उपायांवर, विशेषत: मेट्रो कनेक्टिव्हिटीकडे लक्ष देत आहे.
देवेंद्र फडणवीस जेव्हा इथे मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पासाठी ते नेहमीच दिल्लीला येत असतं. ते या प्रकल्पाच्या पाठिशी लागलेले असायचे. मी त्यांच्या प्रयत्नांचं अभिनंदन करतो. पुणे मेट्रो चालवण्यासाठी सौर ऊर्जेचा देखील व्यापक प्रमाणावर वापर होत आहे. दर वर्षी २५ हजार टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळता येईल.
पुणे नेहमीच आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. तसेच, आयटी क्षेत्रातही पुण्यानं आपली ओळख तयार केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहे. पुणेकरांच्या याच गरजा लक्षात घेता आमचं सरकार अनेक बाबतीत काम करत आहे. मी आत्ताच पुणे मेट्रोमध्ये प्रवास केला. मेट्रोमुळे पुण्यात दळण-वळण सोपं होईल, प्रदूषण आणि ट्रॅफिक जामपासून काहीशी सुटका होईल.
आज मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी ११०० कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात होत आहे. आज पुण्याला ई-बसेस देखील मिळाल्या आहेत. बाणेरमध्ये ई-बसच्या डेपोचं उद्घाटन झालं आहे. आज पुण्याच्या वैविध्यपूर्ण आयुष्यात एक सुंदर भेटवस्तू, आर. के. लक्ष्मण यांच्या जीवनाला समर्पित अशी आर्ट गॅलरी देखील पुण्याला मिळाली आहे.
आज पुण्याच्या विकासाशी जोडलेल्या इतर प्रकल्पांचंही उद्घाटन झालं आहे. पुणे मेट्रोच्या शिलान्याससाठी तुम्ही मला बोलावलं होतं आणि आता लोकार्पणाची संधी देखील तुम्ही मला दिली हे माझं भाग्य आहे. आधी शिलान्यास व्हायचे, पण माहितीच नसायचं की उद्घाटन कधी होईल. मित्रांनो, ही घटना यासाठी महत्त्वाची आहे, की वेळेवर योजना पूर्ण होऊ शकतात हा संदेश यामध्ये आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगींचीही पुण्यतिथी आहे. मी बाबासाहेब पुरंदरेंना देखील आदरपूर्वक स्मरण करतोय. काही वेळापूर्वीच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचं लोकार्पण करायचं भाग्य मिळालं. आपल्या सगळ्यांच्याच ह्रदयात सदासर्वदा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा युवा पिढीमध्ये, येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवतील.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं आहे. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख, आर.जी. भंडारकर, महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या अनेक पुण्यातील स्वातंत्र्य सेनानींना मी आदरपूर्वक श्रद्धांजली देतो.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यासह अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिक, कलाकार, समाजसेवकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीतील माझ्या बंधु-भगिनींना नमस्कार!
अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो - अजित पवार
मुंबई, पुणे, नागपूर इथल्या मेट्रोच्या कामात तुमचं सहकार्य मिळालं तर सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही या कामांसाठी पुढाकार घेऊ - अजित पवार
मला एक गोष्ट पंतप्रधानांना सांगायचीये. राज्यात पहिली मेट्रो अंधेरीत झाली. नागपूरची मेट्रो आपल्याच शुभहस्ते २०१४ला भूमिपूजन झालं आणि २०१९मध्ये मेट्रो सुरू झाली. पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेड या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल - अजित पवार
पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेनं ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे.
येत्या काळात महानगर पालिका १०० टक्के दळणवळण स्वच्छ इंधनाच्या माध्यमातून करेल, एक पैशाचंही प्रदूषण सार्वजनिक वाहतुकीतून होणार नाही - देवेंद्र फडणवीस
विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचं काम झालं आहे. पुणे मेट्रो ही देशातली पहिली अशी मेट्रो आहे की जिथे नॉन फेअरबॉक्स मॉडेल अवलंबण्यात आलं - देवेंद्र फडणवीस
पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पहिलं तिकीट खुद्द पंतप्रधानांनी मोबाईलवर पेमेंट करून काढलं आहे. त्यामुळे आता मी मेट्रोवाल्यांना सांगणार आहे की आम्ही विदाऊट तिकीट प्रवास केला आहे, तेव्हा आमच्याकडून देखील तिकिटाचे पैसे घ्या.
पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एमआयटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात भाषण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी पंतप्रधानांनी स्वत: गरवारे मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढत मेट्रोने प्रवास देखील केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात गरवारे महाविद्यालयापासून पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवतील. आज दुपारी ३ वाजेपासून पुणे मेट्रोची सेवा सुरू होणार असल्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.