पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ( १ ऑगस्ट ) पुण्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह टिळक परिवारातील सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर बोलताना पंतप्रधान मोदींनी लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचा एक किस्सा सांगितला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोकमान्य टिळक यांच्यात युवकांमधील क्षमत ओळखण्याची दूरदृष्टी होती. याचे एक उदाहरण वीर सावरकरांच्या संबंधित एका घटनेमुळे मिळते. वीर सावरकर युवा असताना टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली होती. सावरकरांनी विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे आणि परत आल्यावर स्वातंत्र्यासाठी काम करावे, असं टिळकांना वाटत होते.”
“ब्रिटनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा हे मुलासांठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या नावाने शैक्षणिक शिष्यवृत्ती देत असत. टिळकांनी वीर सावरकरांची शिफारस वर्मा यांच्याकडे केली होती. त्यामुळे वीर सावरकर यांनी लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेतलं आणि बॅरिस्टर बनले. अशाच प्रकारे अनेक युवकांना टिळकांनी घडवलं,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
“पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेजची उभारणी ही टिळकांच्या दूरदृष्टीतून झाली आहे. या संस्थांमधून अनेक युवकांनी शिक्षण घेतलं. या युवकांनी टिळकांचं काम पुढे नेण्याचं काम केलं. आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आपली भूमिका बजावली,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.