PM Narendra Modi to Inaugurate Pune Metro: गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांसाठी चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरलेल्या पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झाला. पहिला टप्पा गरवारे कॉलेज ते वनाज यादरम्यान असून दुसऱ्या टप्प्यामधील दोन मार्गिका आजपासून पुणेकरांना सेवा देताना पाहायला मिळणार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी पुण्यात दाखल झाल्यामुले पुणे मेट्रोची राज्यभर चर्चा पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश आहे. यात पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अशी असेल. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोने आजपासून पुणेकरांना प्रवास करता येणार आहे. एकूण १३ किलोमीटर लांबीच्या या दोन्ही मार्गिका असणार आहेत.

कशा असतील दोन मार्गिका?

पहिली मार्गिका – गरवारे ते रुबी हॉल – अंतर ५.१२ किलोमीटर

स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगर पालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल

दुसरी मार्गिका – फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय – अंतर ८ किलोमीटर

स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजी नगर, जिल्हा न्यायालय

अंडरग्राऊंड स्थानकाचा समावेश

दरम्यान, पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सर्व स्थानके जमिनीच्या वर होती. दुसऱ्या टप्प्यात दिल्लीप्रमाणेच पुण्यातही अंडरग्राउंड स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालय हे स्थानक अंडरग्राऊंड आहे. विशेष म्हणजे, मुंबई मेट्रोमध्ये अद्याप कोणतेही अंडरग्राऊंड स्थानक कार्यरत झालेले नाही.

दररोज दीड लाख पुणेकर प्रवास करणार?

दरम्यान, मेट्रो अधिकारी सोनावणे यांनी एबीपीशी बोलताना पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांवर सुरुवातीच्या काळात साधारण दीड लाख पुणेकर प्रवास करतील. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी व वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी पुणेकरांसाठी सुरू झाले होते. आता जवळपास सव्वा वर्षांनंतर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिका पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modu inaugurates pune metro second phase pmw