महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी आयुक्तांना आदेश दिले असून पुण्यात अनधिकृत बांधकामांबरोबरच धोकादायक बांधकामांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ठाणे येथील इमारत दुर्घटनेनंतर महापालिका हद्दींमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून मुख्य सचिवांनी सर्व आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकामांवर गेल्या तीन दिवसांपासून पुणे महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त विवेक खरवडकर म्हणाले की, शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरील कारवाईला प्राधान्य दिले जाणार आहे. तशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यापूर्वी ज्या बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि तशा कच्च्या झालेल्या पायावर पुन्हा बांधकाम झाले असेल, तर तेथेही कारवाई करण्याचे नियोजन आहे. त्याबरोबरच नदीकाठ, नदीपात्र, नाल्यांमध्ये करण्यात आलेली बांधकामे तसेच काळ्या मातीत वा हलक्या प्रतीच्या मातीत करण्यात आलेली बांधकामे आणि पुरेसा वेळ न देता घाईने करण्यात आलेली बांधकामे यावरही कारवाई केली जाणार आहे.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबरोबरच ज्या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि तरीही तेथे बांधकाम झालेले असेल, तर अशा प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई देखील केली जात आहे. गेल्या वर्षांत अशाप्रकारच्या सव्वाशे प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आल्याचे खरवडकर यांनी सांगितले.
कागदपत्रे पाहूनच खरेदी करा
पुणेकर नागरिकांनी ते राहत असलेल्या वा नवी खरेदी करताना बांधकाम परवानगीची अधिकृत कागदपत्रे तपासून पाहावीत असेही आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे १ मार्च १३ पासून मंजूर केलेल्या बांधकामांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले असून त्यापूर्वीच्या बांधकामाची अधिकृतता संबंधित इमारत निरीक्षकाकडून तपासून घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.

Story img Loader