पुणे : करोनाच्या काळात पुणे महानगरपलिकडे खासगी कंपन्यांकडून कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून आलेला साडेसात कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या रकमेतून केवळ व्याज मिळविण्यामध्येच महापालिका गुंतली असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला.
देशात करोनाची साथ असताना पुणे महापालिकेने खासगी कंपन्या तसेच नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन विविध कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडामधून कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला. यातील निधी खर्च करण्यास महापालिका असमर्थ ठरल्याचा आरोप वेलणकर यांनी केला.
हेही वाचा…‘रेडझोन’ला ‘लाल दिवा?’ सीमेबाबत संभ्रमावस्था कायम; अंतिम नकाशाची प्रतीक्षा
वेलणकर म्हणाले, ‘२०२०-२१ मध्ये ४ कोटी ८९ लाख, तर २०२१-२२ मध्ये महापालिकेला ३ कोटी १० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या. मात्र, महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही, तर २०२१-२२ मध्ये करोनाच्या रुग्णांसाठी खाटा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक कोटी ३० लाख रुपये खर्च केले. हा खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवर महापालिकेला ७० लाख रुपयांचे व्याज मिळाले आहे. सध्या पालिकेच्या कोविड सीएसआर खात्यात ७ कोटी ४३ लाख रुपये पडून आहेत.’
महापालिका देणग्यांच्या माध्यमातून मिळालेल्या या निधीचा वापर करीत नसल्याची बाब दीड वर्षापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वेलणकर यांनी केला. पालिकेला मिळालेल्या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रुग्णालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी करून गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यात घट वर्षभरात १६ हजार गुन्ह्यांची नोंद; गतवर्षीपेक्षा ५६८ ने घटले गुन्हे
करोनाच्या काळात महापालिकेने केलेल्या कामांची बिले अद्यापही प्रलंबित आहेत. ही बिले देण्याचा निर्णय झाल्यानंतर या निधीतून ती दिली जाणार आहेत. हा निधी खर्च झाल्यास प्रलंबित बिले देण्यासाठी हक्काचा निधी राहणार नाही. तसेच, हा निधी इतर ठिकाणी वापरता येईल का? याची शहानिशा करून निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले.