पुणे : दीपावलीचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी हवेचे तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असून फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील विविध भागांमध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. फटाक्यांची आतषबाजी केल्याने वायुप्रदूषण होते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आलेले आहे. हे प्रकार टाळून सुरक्षितपणे दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करावा, असे पालिकेने म्हटले आहे.

आनंदाच्या या उत्सवात विनाकारण उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण हे नागरिकांसह इतर प्राण्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.

हेही वाचा >>> रस्ते सफाई वाहनांवर आता ‘ऑनलाइन’ लक्ष

दिवाळीच्या काळात वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे विविध श्वसनाचे आजार होत असल्याचे समोर आले आहे.  अनेक फटाक्यांचा आवाज अत्यंत मोठा असल्याने बहिरेपणा सारख्या समस्यांना देखील नागरिकांना तोंड द्यावे लागते. काही उत्साही नागरिकांच्या आणि तरुणाईच्या चुकीमुळे अनेकांना सणासुदीच्या काळात रुग्णालयाची पायरी चढावी लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असते. सण, उत्सव आनंददायी वातावरणात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने आता काही निर्बंध देखील लादले आहेत.

हेही वाचा >>> पिंपरीतील ११२२ जणांचे पिस्तूल पोलिसांकडे जमा

नागरिकांसाठी सूचना

– शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळावा

– धूर करणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळावा

– मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांचा वापर करू नये

– शांतता क्षेत्र म्हणजे शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये आदी ठिकाणी फटाके उडवू नयेत.

– घर तसेच कार्यालय सजविण्यासाठी एलईडी दिवे किंवा सौरदिवे यांचा वापर करावा.

– प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरून सजावट करावी.

‘ एमपीसीबी ‘ कडून लक्ष दिवाळीच्या काळात शहरात ध्वनी प्रदूषण तसेच हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून  (एमपीसीबी) घेण्यात येणार आहेत. फटाक्यांबाबत वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके उडविले जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या कोणत्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजविले गेले याचा अभ्यास करण्यासाठी विविध भागात ११ स्टेशनवरून मोजणी केली जाणार आहे. कोणत्या वेळी सर्वाधिक आवाज नोंदविला गेला यातून माहिती देखील यामधून येणार आहे, अशी माहिती एमपीसीबी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc appealed pune residents to celebrate eco friendly diwali pune print news ccm 82 zws