महापालिकेच्या पथ विभागाने कोटय़वधी रुपयांच्या निविदांची प्रक्रिया दोन वेळा केल्यामुळे या निविदांबाबत आता शंका घेतली जात आहे. पावसाळ्यात शहरातील सर्व रस्ते उखडण्याच्या प्रकारामुळे पथ विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रकारात अधिक दराच्या निविदा मंजूर होण्याचीही शक्यता असून पथ विभागाच्या या निर्णयामुळे पालिका अंदाजपत्रकाला खड्डा पडणार आहे.
पथ विभागातर्फे शहरातील पन्नासहून अधिक रस्त्यांची कामे करून घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. निविदेतील बहुतांश कामे रस्त्यांच्या पुनर्डाबरीकरणाची आहेत, तर काही रस्त्यांना पदपथ बांधणे तसेच काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचेही नियोजन आहे. चौक सुधारणेच्याही काही कामांचा समावेश या निविदांमध्ये आहे.
पथ विभागातर्फे जेव्हा या कामांसाठी आलेल्या निविदा उघडण्यात आल्या, त्या वेळी सर्व निविदा महापालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा १५ ते २० टक्के कमी दराने आल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यपद्धतीनुसार या निविदा मंजुरीची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांचे काम चांगल्या दर्जाचे असेल किंवा कसे, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आणि निविदा मंजुरीसाठी पुढे न पाठवता किंवा रद्द न करता करता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय झाला असला, तरी एकाच कामासाठीची निविदा प्रक्रिया दुसऱ्यांदा राबवायची झाल्यास, त्यासाठी ज्या आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात त्या न घेताच दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याची चर्चा आहे. दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्यानंतर मात्र सर्वच निविदा महापालिकेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा पाच ते दहा टक्के कमी दराने आल्या. या दोन्ही प्रक्रियांमध्ये भाग घेणारे ठेकेदार वेगवेगळे आहेत. दुसऱ्यांदा मागवण्यात आलेल्या निविदांपेक्षा पहिल्या प्रक्रियेतील निविदा कमी दराच्या असल्याने त्याच निविदा मंजूर करणे अपेक्षित आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या प्रक्रियेतील काही निविदा मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला आहे. तसे झाल्यास महापालिकेला जादा खर्च करावा लागणार असून पथ विभागाच्या या निर्णयाचा अंदाजपत्रकालाच थेट फटका बसणार आहे.
महापालिकेची आर्थिक घडी योग्य राखण्यासाठी कामांवरील खर्च कमी करावा, नवी कामे सुरू करण्याऐवजी चालू कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, तसेच आधीच्या कामांचा पुनर्विचार करून त्यावरील खर्च कमी करता येईल का, याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी नुकत्याच सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत. या सूचनांच्या पाश्र्वभूमीवर पथ विभाग आता कोणत्या निविदा मंजूर करणार याबाबत उत्सुकता आहे.
मुळातच, या कामांसाठी निविदा पुन्हा का मागवण्यात आल्या याचे कोणतेही सयुक्तिक कारण देण्यात आलेले नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही त्याबाबत पथ विभागाने अद्याप मंजुरीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत. परिणामी, प्रत्यक्ष कामे सुरू होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

Story img Loader