पुणे : रस्त्यांवर तसेच चौकाचौकांमध्ये लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करून ते तातडीने काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र सध्या शहरातून फिरताना दिसून येत आहे.
शहरातील चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या बेकायदा फलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिलेले असतानाही याकडे दुर्लक्ष करत आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. प्रशासन आयुक्तांचे आदेशच जुमानत नसेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा >>> प्रतीक्षेतील स्वयंपुनर्विकासाच्या सोसायट्यांचा मार्ग मोकळा
शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात फलक उभारण्यात आले असून त्यामुळे शहर विद्रूप झाल्याचे समोर आले आहे. रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये नवनिर्वाचित आमदारांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे हे जाहिरात फलक आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर बेकायदा पद्धतीने लावण्यात येणाऱ्या विजयी उमेदवारांच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी पालिकेच्या आकाशचिन्ह तसेच अतिक्रमण विभागाला तातडीने या फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.
हेही वाचा >>> सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट; सीमाशुल्क विभागाकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण
आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे सोडून या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण पालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतले आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बेकायदा फलकांची संख्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या आकारातील फलक लावण्यात आले आहेत. चौकाचौकांमध्ये लावण्यात आलेल्या या जाहिरात फलकांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण करणारे दिवे झाकले गेले आहेत, तर काही रस्त्यांवरील दिशादर्शक फलक झाकले गेले आहेत. शहरभर झळकणाऱ्या या अनधिकृत फलकांमुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना त्रास होत आहे. शहरातील जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरासह मध्यवर्ती पेठांतील अनेक चौकांमध्ये आणि रस्त्यांवर हे बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आल्याने शहर अक्षरश: विद्रूप दिसत आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या या फलकांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हे बेकायदा जाहिरात फलक तसेच उभे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd