शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच पुणे मेट्रो प्रकल्प हा माझा प्राधान्याचा विषय राहील, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच मंगळवारी रात्री दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आहे आणि मेट्रोसाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असेही आयुक्त म्हणाले.
महापालिका आयुक्त म्हणून कुणाल कुमार यांनी बुधवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी सर्व खाते प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. या शहरात आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा खर्च व अन्य आनुषंगिक बाबींबाबत केंद्राने जी माहिती मागवली आहे, ती केंद्राला तत्काळ दिली जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाला खर्च किती येणार आहे तसेच कर्जाची परतफेड कशी केली जाणार आहे, आदी माहिती केंद्राने मागवली असून ती तातडीने केंद्राला कळवली जाईल. यापुढे मी सातत्याने मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. त्याबाबत दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे.
वेळ मूल्यवान आहे, त्यामुळे शहरातील महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक दिवशी मी सकारात्मक विचारातूनच काम करीन असे सांगून आयुक्त म्हणाले, की मेट्रो, पाणीपुरवठा, कचरा, वाहतूक या विषयांना प्राधान्य दिले जाईल. शहराचे विस्तारित स्वरूप पाहता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामे जलदगतीने करणे शक्य होईल.
‘सर्वाचे सहकार्य हवे’
महापालिका खाते प्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी सर्वाना सहकार्याचे आवाहन केले. सर्व खाते प्रमुखांसाठी माझ्या कार्यालयाची दारे सदैव खुली असतील. नागरिकांचे आणि शहराचे प्रश्न सोडवणे हाच माझा कार्यक्रम राहील. शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगून नागपूर, कोल्हापूर येथे मी काम केले आहे. पण एवढय़ा मोठय़ा शहरात मी प्रथमच आयुक्त म्हणून काम करणार आहे. सर्वानी सहकार्य केले तर निश्चितच चांगले काम करता येईल, अशी सकारात्मक भावना आयुक्तांनी या बैठकीत व्यक्त केली.

Story img Loader