पुणे : शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे आजारी पडले आहेत. त्यांच्यात डेंग्यूची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांचा डेंग्यूचा प्रथमिक अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. डासांमार्फत डेंग्यूचा प्रसार होतो. यामुळे डास प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेकडून सुरू आहेत. यातच आता महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यात डेग्युसदृश लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आयुक्तांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय प्रवास करताय? ‘पल्मनरी एम्बोलिझम’च्या वाढत्या धोक्याबद्दल जाणून घ्या…

महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांचे शासकीय निवासस्थान मॉडेल कॉलनीत आहे. या निवासस्थानाचा परिसर मोठा आहे. आयुक्तांना डेग्युसदृश लक्षणे आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाने या निवासस्थानाची पाहणी करून तिथे औषध फवारणी केली.

हेही वाचा >>> ज्येष्ठ नागरिकाच्या जगण्याची केवळ दोन टक्के शक्यता असूनही असे वाचले प्राण…

झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ शहरात झिकाचा धोका वाढला असून, आणखी तीन जणांना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या २७ वर पोहोचली असून, त्यातील ११ गर्भवती आहेत. झिकाचा धोका गर्भवतींना अधिक असल्याने रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील गर्भवतींच्या तपासणीवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. कर्वेनगरमधील स्प्रिंगनेस सोसायटीतील ३३ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला आहे. ही महिला ३५ आठवड्यांची गर्भवती आहे. तिला अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली होती. कोथरूडमधील सुमंगल सोसायटीतील ७८ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला असून, त्याच्यात ताप, अंगावर लाल चट्टे आणि सांधेदुखी अशी लक्षणे आढळून आली. पाषाणमधील भुवनेश्वर कॉलनी रोड परिसरातील ८४ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला असून, त्याच्यात ताप, अशक्तपणा आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसून आली, अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc commissioner suffer with dengue like symptoms pune print news stj 05 zws