पुणे : राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात असून, महापालिकेने खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, रॅपिड अँटिजेन चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याने चाचणी कशी करायची, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उपस्थित झाला आहे. त्यातच जेएन.१ बाबत स्थापण्यात आलेल्या नवीन टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनाही महापालिकेकडून रुग्णालयांना कळविण्यात न आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यात जेएन.१ चे २५० रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक १५० रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यातील रुग्णसंख्या जास्त असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. असे असताना आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना केवळ सूचना करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्याची सूचना केली आहे. मात्र, शहरात रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या किटचा तुटवडा असल्याने या चाचण्या करता येत नसल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने जेएन.१ चा धोका वाढताच नवीन टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत नवीन मार्गदर्शक सूचना सर्व आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप या सूचना खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचविलेल्या नाहीत. याउलट आरोग्य विभाग आधीच्या मार्गदर्शक सूचना कायम असून, त्याचे पालन खासगी रुग्णालयांनी करावे, असे सांगत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास करायचे काय?
एखाद्या संशयित रुग्णाची चाचणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नेमके काय करायचे याबाबत महापालिकेच्या स्पष्ट सूचना नाहीत, असा दावा खासगी रुग्णालयांनी केला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे विलगीकरण कसे करावे, त्याचे गृह विलगीकरण करावयाचे झाल्यास ते किती दिवस करावे, याबाबतही सूचना नसल्याने गोंधळ वाढत असल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे.
महापालिकेने खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या किटचा तुटवडा असल्याने चाचण्या करणे शक्य होत नाही. महापालिकेने जेएन.१बाबत नवीन मार्गदर्शक सूचनाही रुग्णालयांना दिलेल्या नाहीत.
-डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (पुणे शाखा)
करोनाचा धोका वाढल्याने रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन किटचा पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही. त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात बाजारात किट उपलब्ध आहेत.
-डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महापालिका
हेही वाचा : पुण्यात जेएन.१ चा धोका वाढला! तब्बल १५० रुग्ण; राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या
मागील काही काळात रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या किटची मागणी कमी होऊन मोठ्या प्रमाणात त्यांचा साठा कालबाह्य झाल्याने फेकून द्यावा लागला. त्यामुळे किटचा साठा नियंत्रित करण्यात आला आहे. रुग्णालयांनी मागणी नोंदविल्यास त्यांना मागणीनुसार पुरवठा केला जाईल.
-अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट