शहरात बेकायदेशीररीत्या टाकण्यात आलेले स्टॉल तसेच टपऱ्या आणि अनधिकृत शेड यांच्यावर सरसकट ठोस कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासनावर कठोर टीका करणाऱ्या नगरसेवकांच्याच प्रभागात अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणांवर गेल्या आठवडय़ात झालेल्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार टीका करत महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले होते. त्यातही ज्यांनी अधिक कठोर टीका केली आणि अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले अशा नगरसेवकांच्या प्रभागात सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात आली असून अनधिकृत स्टॉल आणि टपऱ्यांबरोबरच अधिकृत स्टॉलही पाडण्याची कारवाई अधिकारी करत आहेत.
महापालिकेच्या सभेत माजी सभागृहनेता सुभाष जगताप आणि काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी अतिक्रमण विभागावर टीका केली होती. जे नगरसेवक सभेत बोलले त्यातील सर्वात कठोर टीका सुभाष जगताप यांची होती. ‘महापालिकेची अवस्था ग्रामपंचायतीपेक्षा वाईट झाली आहे. त्यामुळे ही महापालिका आहे का ग्रामपंचायत हेच कळत नाही. एखादी ग्रामपंयातही महापालिकेपेक्षा  कार्यक्षम असेल,’ अशी टाका जगताप यांनी केली होती. तर भवानी आणि नाना पेठेतील अतिक्रमणांकडे लक्ष वेधताना बागवे यांनी अतिक्रमण विभागातील गोंधळाला लक्ष्य केले होते.
महापालिकेकडून सोमवारपासून जी कारवाई सुरू झाली त्यात पहिल्या दिवशी बागवे यांच्या प्रभागात आणि मंगळवारी जगताप यांच्या प्रभागात कारवाई हाती घेण्यात आली. बागवे यांच्या प्रभागात ज्या ठिकाणी खरोखरच अनधिकृत टपऱ्या तसेच स्टॉल आणि रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात साहित्य पडले होते तेथे कारवाई करण्यात आली नाही. उलट, सोसायटय़ा आणि अनेक दुकानदारांच्या अधिकृत शेडवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
प्रशासनाने मंगळवारी तळजाई परिसरात अनधिकृत बांधकामे म्हणून काही बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू केली होती. त्यानंतर ही माहिती जगताप यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखवली. बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र, संबंधित बांधकामांवर तुम्ही अतिक्रमण म्हणून कारवाई करू शकत नाही, असे जगताप यांनी सांगितल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.

मुख्य सभेत कडक टीका केली म्हणून माझ्या प्रभागातील बांधकामांवर मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली होती. मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. ही कारवाई फक्त खुनशी आणि मनमानी पद्धतीने तसेच कायदा हातात घेऊन सुरू होती. महापालिकेने परवाना दिलेले स्टॉल या कारवाईत तोडण्यात आले.
सुभाष जगताप, माजी सभागृहनेता
भवानी पेठ, महात्मा फुले पेठ येथे फक्त कोणाला तरी त्रास व्हावा याच उद्देशाने कारवाई करण्यात आली. ही कारवाई कशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
अविनाश बागवे, नगरसेवक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा