अनधिकृत बांधकामांच्या संरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांचे राजीनामे ताबडतोब मंजूर करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली करावी व अशी बांधकामे नियमित करावीत, असे पत्र देऊन तसेच राज्य शासनाचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेरा नगरसेवकांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे पक्षाकडे दिलेले असल्यामुळे त्याबाबत अद्याप पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, या नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामांच्या संरक्षणाची मागणी केलेली असल्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार त्यांचे पद रद्द करावे, असे पत्र सजग नागरिक मंच आणि नागरी हक्क संस्था या संघटनांतर्फे गुरुवारी आयुक्तांना देण्यात आले.
महापालिका कायद्यातील कलम १ (ड) मधील तरतुदीनुसार अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या वा त्याला मदत करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. पालिका सदस्याने कोणतेही बेकायदेशीर वा अनधिकृत बांधकाम केले असेल किंवा तसे तो करीत असेल; किंवा असे बेकायदेशीर वा अनधिकृत बांधकाम करण्यास प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तो जबाबदार असेल वा पालिका सदस्य या नात्याने त्याने मदत केलेली असेल, असा पालिका सदस्य; सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरेल, असे कलम १ (ड) मध्ये म्हटले आहे. त्यानुसार संबंधित तेरा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या पत्रातून सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे आणि नागरी हक्क संस्थेचे सुधीरकाका कुलकर्णी यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा