शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ९३७ रुग्ण आढळले आहेत.
महापौर चंचला कोद्रे तसेच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी बुधवारी डेंग्यूच्या प्रश्नाबाबत आयुक्त विकास देशमुख यांची भेट घेऊन डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या व उपाययोजना याबाबत चर्चा केली. जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २४९ होती, तर जुलै महिन्यात ही संख्या ५४७ झाल्याचे महापौरांनी सांगितले. दोन महिन्यातच ही संख्या वाढली असून धनकवडी, आंबेगाव, हडपसर या भागातील रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.
डेंग्यूचा प्रादुर्भाव ज्या डासांपासून होतो त्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी तीन दिवसांहून अधिक काळ साठवून ठेवू नये. तसेच स्वच्छ पाणी सातत्याने झाकून ठेवावे. कुंडय़ा, घरात लावली जाणारी शोभेची झाडे यांच्या खाली ज्या थाळ्या वा ट्रे ठेवले जातात त्यातही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. वातानुकूलन यंत्रे, फ्रीज यांच्याही ट्रेमध्ये पाणी साठू देऊ नये. घरात ज्या पिंपांमधून वा छोटय़ा-मोठय़ा टाक्यांमधून पाणी साठले जाते त्यांचीही झाकणे व्यवस्थितरीत्या बंद करावीत. ड्रेनेजची झाकणे, पावसाळी जाळ्या यांचीही स्वच्छता होत आहे ना यावर लक्ष ठेवावे. तसेच घरात वा परिसरात भंगार साहित्य साठून राहू नये याची काळजी घ्यावी. जुनी भांडी, जुने टायर आदी साहित्य ठेवले गेले असल्यास तेही निकाली काढावे. डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अशाप्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Story img Loader