महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्षात पुण्यात घमासान सुरू आहे. या दोन्ही पक्षांना महापालिकेत स्पष्ट बहुमतासाठी मोठाच आटापिटा करावा लागत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला तास-दोन तास बाकी असेपर्यंत विविध राजकीय पक्षांचे बदलत गेलेले उमेदवार आणि उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात सर्वच पक्षांना आलेले अपयश या पाश्र्वभूमीवर एकदाचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र त्यानंतरही पक्षांकडून दिले जाणारे एबी फॉर्म, उमेदवारांची अर्ज माघारी यातही अनेक प्रभागांमध्ये नाटय़ घडले. एकुणातच याद्यांचा सर्वपक्षीय घोळ आणि बंडखोरी टाळण्यासाठी म्हणून उमेदवार यादी घोषित न करण्याचा जो मार्ग सर्व पक्षांनी अवलंबला त्यातून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चारही पक्षांनी निवडणुकीपूर्वी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर युती तुटली आणि दोन्ही पक्ष आमने-सामने आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी शेवटच्या दिवशी पुण्यात आघाडी केली. अर्थात काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा प्रकारे हे दोन पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरा सामना असल्यामुळे पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार आणि विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

नवी प्रभाग रचना

नव्या प्रभाग रचनेत महापालिका निवडणुकीसाठी शहरात ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत आणि त्यातील ३९ प्रभागांमधून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांमधून प्रत्येकी तीन असे मिळून १६२ नगरसेवक निवडून येतील. नव्या रचनेनुसार चार सदस्यांचे प्रभाग झाल्यामुळे प्रभागांचा भौगोलिक विस्तार खूप मोठा झाला आहे. एकेका प्रभागात ४० ते ७० हजार मतदार असे चित्र आहे. प्रचारासाठी मिळालेल्या दोन आठवडय़ांत या सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना अशक्य आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात खर्चाची मर्यादा पाच लाख अशी होती. त्यानंतर ती दहा लाख करण्यात आल्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे लक्ष्य

कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पूर्ण बहुमत मिळवणे हे राष्ट्रवादीचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शेजारच्या पिंपरीतील सत्ता टिकविण्याचीही जबाबदारी अजित पवार यांच्यावरच आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही गेले तीन दिवस पुण्यातच असून रोज सभा तसेच मेळावे असे कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांबरोबर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे या नेत्यांचेही दौरे सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष

भारतीय जनता पक्षानेही एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार निवडीपासूनच्या प्रत्येक टप्प्यावर पुण्यात बारीक लक्ष ठेवले असून पुणे आणि पिंपरीसाठी मिळून त्यांनी सात सभाही दिल्या आहेत. दोन्ही शहरांतील नेत्यांना त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच पक्षाचे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री पुण्यात दौऱ्यावर असून विविध प्रभागांमध्ये त्यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे. पालकमंत्री गिरीश बापट तसेच खासदार अनिल शिरोळे आणि पुण्यातून निवडून गेलेले आठ आमदार या सर्वावरच पक्षाच्या नेत्यांची भिस्त आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांची पत्नी, नगरसेविका रेश्मा भोसले प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या आणि त्यांना उमेदवारीचीही खात्री होती. मात्र त्यांना शेवटच्या दिवशी पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अर्ज भरण्यासाठी तासभर बाकी असताना भोसले यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवली. अर्थात त्यांचा मूळ अर्ज त्यानंतर भाजपने दिलेला एबी फॉर्म या बाबींना आव्हान देण्यात आल्यानंतर त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, असा निकाल निवडणूक आयोगाने दिला. मात्र त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि दोन्ही न्यायालयांनी भोसले या चिन्हावर नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढू शकतील, असा निर्णय दिला. त्यामुळे त्यांना भाजपचा एबी फॉर्म मिळालेला असूनही कमळ चिन्हावर निवडणूक लढवता आलेली नाही. त्यानंतरही भोसले यांना पुरस्कृत केल्याचे भाजपने जाहीर केले असून या प्रभागातील लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी सभागृहनेता नीलेश निकम तर काँग्रेसकडून नगरसेवक दत्ता बहिरट हे भोसले यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत.

गुन्हेगारी, संपत्ती, शिक्षण

उमेदवारांनी अर्जाबरोबर दिलेली प्रतिज्ञापत्रे संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यामुळे सर्वाचीच सद्य:स्थिती मतदारांसमोर आली असून गुन्हे दाखल असलेले उमेदवार देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राष्ट्रवादीने गुन्हे दाखल असलेल्या पंचवीस जणांना, तर शिवसेनेने चोवीस जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने गुन्हे दाखल असलेल्या बावीस जणांना उमेदवारी दिली आहे. महापालिका निवडणूक लढवणाऱ्या एकूण एक हजार ९० उमेदवारांपैकी निम्मे उमेदवार पदवीधर नसल्याचीही वस्तुस्थिती समोर आली आहे. निवडणूक लढवत असलेल्यांपैकी २६१ उमेदवार कोटय़धीश आहेत आणि त्यांची सरासरी संपत्ती चार कोटी आहे.

पुणे महापालिका निवडणुकीवर दृष्टिक्षेप

  • निवडणूक रिंगणात एक हजार ९० उमेदवार
  • शरद पवार, अजित पवार सातत्याने पुण्यात
  • राज्य मंत्रिमंडळातील तसेच केंद्रातील अनेक मंत्रीही पुण्यात

untitled-12

Story img Loader