पदार्पण
दत्तवाडी परिसरात पदपथावरील अतिक्रमण कारवाईमध्ये पारधी समाजाच्या बांधवांना हटविल्याबद्दल महापालिकेवर मोर्चा नेणाऱ्या राजश्री काळे या आता त्याच महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून जाणार आहेत. तर, ज्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते त्याच पालकमंत्र्यांनी तिकीट दिल्यामुळे राजश्री या नगरसेविका झाल्या आहेत.
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या आणि यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी राजश्री काळे या पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आल्या आहेत. गरवारे महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करीत असलेल्या राजश्री या पारधी समाजाच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत. शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे काळे राजकारणात आल्या आणि लोकप्रतिनिधीही झाल्या.
वयाच्या दहाव्या वर्षांपासून पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राजश्री काम करू लागल्या. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली यमगरवाडी येथील रात्रशाळेमध्ये त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले.
प्रभुणे यांच्या प्रभावामुळे त्या संघाचे काम करू लागल्या. ज्या खडतरपणे आपल्याला आयुष्य जगावे लागले तशी वेळ आपल्या समाजातील मुलींवर येऊ नये या उद्देशातून त्यांनी राजश्री आदिवासी पारधी संस्था स्थापन केली आहे. पारधी समाजातील मुलींवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात त्या सातत्याने लढत असतात. त्यांच्या या सामाजिक कामाला आता राजकारणातील प्रवेशामुळे व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे.
पारधी म्हटले की चोर, दरोडेखोर आणि मारामाऱ्या करणारे असा या जातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही प्रमाणात दूषित आहे. त्यामुळे पारधी ही जात अजूनही काही प्रमाणात अस्पृश्य जीवन जगत आहे. आपलेसे करून समाजाने पारधी जातीला सामावून घ्यावे यासाठी माझे छोटय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही पारधी जातीतील स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार होत असतात. या महिलांना आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव नाही. त्यांनी जीवनामध्ये संघर्ष करावा आणि आपल्या पायावर उभे राहावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे राजश्री काळे यांनी सांगितले. बालपणापासून मीदेखील कष्टात आणि हलाखीमध्ये दिवस काढले आहेत. विवाहानंतरही हालअपेष्टा संपल्या नाहीत. कुटुंबाला सावरून २००४ मध्ये गरवारे महाविद्यालयामध्ये हंगामी स्वरूपाची शिपाई म्हणून नोकरी लागली. तेव्हापासून माझे आयुष्यच पालटले. आता पारधी जमातीतील स्त्रियांना मानसन्मान मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे राजश्री काळे यांनी सांगितले.