दो न खासदार, त्यापैकी एक केंद्रात मंत्री, आठ आमदार, त्यापैकी दोन राज्यात मंत्री, त्यातही एक पालकमंत्री आणि ९८ नगरसेवक. कोणत्याही राजकीय पक्षासाठी अशी स्थिती स्वप्नवत वाटावी अशी. पण पुण्यात हे घडले. स्व. रामभाऊ म्हाळगी, शिवाजीराव आढाव, गोविंदराव मालशे, दत्तोपंत मेहेंदळे, मालतीबाई परांजपे यांच्यासारख्यांना या शहरात असे कधी घडेल, असे वाटलेही नसेल. पुण्याच्या ऱ्हासाला सत्ताधारीच जबाबदार असल्याचे ओरडून सांगत सांगत या सगळ्यांचे घसे बसले होते. पुण्यात भाजपला खासदारपद मिळाले, पण महानगरपालिकेत सत्ता मात्र कधीच मिळाली नाही. गेल्या दोन दशकांत पालिकेत एकहाती सत्ता कुणालाच मिळाली नव्हती. भाजपच्या पारडय़ात पडलेले हे एकहाती सत्तेचे दान या शहराचे भवितव्य घडवणार आहे. एवढे सगळे मनासारखे झाले असेलच, तर खरी परीक्षा पुढेच आहे. पैशांचा महापूर, प्रचंड मग्रुरी आणि लोकशाही खुंटीला अडकवून मते मिळवण्यासाठी झालेली केविलवाणी धडपड पुणेकरांनी या निमित्ताने पाहिली. त्यांना आता बदल घडायला हवा आहे.

जे निवडून आले आहेत, त्यांनी उगाच महात्मा फुले आणि आचार्य अत्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण महानगरपालिकेत येत आहोत, वगैरे सांगू नये. त्यांच्यापैकी कुणाचाच एवढा वकूब नाही. महानगरपालिकेतील नगरसेवकाला शहराच्या विकासाचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. हा अधिकार वापरताना नागरी हितापेक्षा हितसंबंधांनाच अधिक महत्त्व प्राप्त होते. ते देवघेवीपासून ते नात्यागोत्यापर्यंत अनेक पदराचे असतात. आजवर प्रत्यक्षात शहर अधिक बकाल कसे होत जाईल, याचेच निर्णय आजवर घेतले गेले. त्यामुळे मुठा नदीत मैलापाणी सोडत असल्याबद्दल कुणासही लाज वाटत नाही. पालिकेच्या हद्दीत आलेल्या नव्या गावांमध्ये राहणारे नागरिक नावापुरतेच शहरात आले आहेत आणि त्यांचे जगणे तेवढेच भीषण राहिलेले आहे, याबद्दल कुणाला कसलीही चाड नाही. रस्त्यांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि मैलापाण्यापासून ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत पालिकेतील नगरसेवकांनी आजवर कधीही जनहिताचा विचार केला नाही. त्यामुळे आता केंद्रापासून ते पालिकेपर्यंत सबकुछ भाजप झाल्याचे सांगत काम दिसले नाही, तर या विजयालाही काही अर्थ नाही.

भाजपला आता कोणतेही कारण सांगता येण्यासारखी स्थिती नाही. ‘काय करू. जोडीदार पक्ष पायात पाय घालून अडवतात, विरोधक कामच करू देत नाहीत, काठावरचे बहुमत असल्याने सगळ्यांना बरोबर घेऊनच जावे लागते,’ यांसारखी शहाजोगपणाची कारणे पुढे करत हवे तेच घडवून आणणारे नगरसेवक आजवर पुण्याने पाहिले आहेत. सत्तेचा माज आणि त्याची धुंदी यातून विकासकामांमध्ये होणारा अतोनात भ्रष्टाचार पुणेकरांनी अनुभवला आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकाला जास्तीत जास्त त्रास कसा होईल, याचाच सदैव विचार होत असतो की काय, अशी शंका यावी, असे हे चित्र होते. भाजपला आता असे वागण्याची परवानगी नाही. जे कुणी गुंड भाजपच्या तिकिटावर निवडून आले असतील, त्यांच्या नाकात वेसण घालून त्यांना वठणीवर आणण्याचे कामही आता येथील नेत्यांना करावे लागेल. शहराचा एकत्रित विचार करून विकासाचे नियोजन करावे लागेल.

एवढी मोठी एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही भाजपला त्याचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवता आले नाहीत, तर पुणेकरांएवढे करंटे कुणीच नसतील. घरातल्या सग्यासोयऱ्यांना आपल्याबरोबर मिरवत ठेवण्याची संस्कृती आता भाजपमध्येही फोफावू लागली आहे. भ्रष्टाचार हा आता भाजपच्याही वळचणीला येऊ लागल्याची जाहीर चर्चा होणे, हेही आता धोकादायक ठरणार आहे. त्यामुळेच आयुष्यभर सतरंज्या उचलणाऱ्यांना पैसैवाला धनदांडगा आदेश देऊ लागला, तर ते झिडकारण्याची हिंमत सामान्य कार्यकर्त्यांमध्ये येणे ही त्यासाठी खरी गरज आहे. पूर्वीच्या काळी जनसंघात किंवा भाजपमध्ये पराभव झाल्यानंतर एकत्र बसून भेळ खायची आणि पुन्हा कामाला लागायचे, अशी पद्धत होती. भाजपच्या आजच्या कार्यकर्त्यांना आज मिळालेला मोठा विजय पचवण्याची पण ताकद नसेल, तर पुणे याहूनही बकाल होईल, यात शंका नाही.

mukund.sangoram@expressindia.com  

Story img Loader