पारंपरिक मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्याचे सातत्य कायम ठेवल्यामुळे कसब्यामध्ये शांततेत मतदान झाले. मतदान करताना छायाचित्र घेण्यावरून एका मतदाराने पोलिसांशी वाद घातला. संवेदनशील असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथून सलग पाच वेळा भाजपचे गिरीश बापट विजयी झाले आहेत. तर, महापालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसवेक कसब्यातूनच निवडून येतात. हा भाजपचा गड असला तरी यंदा चार सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ची धास्ती सर्वच उमेदवारांना जाणवत आहे. त्यामुळेच हक्काच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे.

या भागातील नूमवि प्रशाला, नूमवि प्राथमिक शाळा, कन्याशाळा, अहिल्यादेवी प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, वा. ब. गोगटे प्रशाला, पेरुगेट भावेस्कूल, आदर्श विद्यालय, सरस्वती मंदिर, शेठ हिरालाल सराफ प्रशाला या मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदार कुटुंबीयांसमवेत मतदानासाठी येत होते. त्यामुळे कसब्यात काही ठिकाणी रांगा दिसत असल्या तरी सर्वत्र धिम्या गतीने मतदान सुरू होते. ज्येष्ठ नागरिकांना चार वेळा कळ दाबण्यासंदर्भात मतदान अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागले. अनेक मतदारांनी तीनच ठिकाणी कळ दाबली. मात्र, चौथे बटन दाबल्याखेरीज मतदान झाल्याचा बीप वाजत नसल्यामुळे अनेकांना मतदानासाठी वेळ लागला.

प्रभाग क्रमांक १५ चे मतदार असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांनी अहिल्यादेवी प्रशाला येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांच्या पत्नी गिरिजा बापट आणि मुलगा गौरव बापट यांनीही मतदान केले. गणेश बिडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील लढतीमुळे संवेदनशील झालेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

मी गाडी चालवीत नाही

मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशातून पुणे महापालिका आणि पेट्रोल डिझेल असोसिएशन ऑफ पुणे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्या  शंभर मतदारांना एक लिटर पेट्रोल मिळण्यासाठी स्क्रॅच कूपन देण्याचा उपक्रम राबविला. नूमवि प्रशाला येथे एक ज्येष्ठ महिला, त्यांची सून आणि नात अशा तीन पिढय़ांनी मतदान केले. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याने त्या ज्येष्ठ महिलेला हे कूपन दिले. ‘मला नको. मी काही गाडी चालवीत नाही. मतदान हे माझे कर्तव्य आहे आणि आम्ही कोणत्याही प्रलोभनाविना मतदान करतो,’ असे त्या महिलेने बाणेदारपणे सांगितले.

मतदानावेळी छायाचित्र घेण्यावरून पोलिसांशी वाद

वसंतराव वैद्य प्रशाला येथे प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवारांसाठी मतदान सुरू होते. पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीत मतदानासाठी एक दाम्पत्य आले. मतदान करण्यासाठी गेलेल्या पतीने मोबाईल पत्नीकडे दिला आणि मतदान करीत असताना फोटो घे अशी सूचना केली. मात्र, मतदान केंद्रावरील महिला अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी मतदान करताना फोटो घेता येणार नाही, असे त्या व्यक्तीला सांगितले. मात्र, तो मतदार काही केल्या ऐकेना. निवडणूक आयोगाचे आदेश असल्याचे परिपत्रकच त्या मतदाराला दाखविण्यात आले. ‘तुम्ही विलासराव देशमुख यांना फोटो घेऊ देता. मग, मी घेतला म्हणून बिघडले कुठे’, असा प्रश्न करताना त्या मतदाराच्या रागाचा पारा चढला. शेवटी पोलीस कर्मचाऱ्याने बाहेर काढण्यासाठी त्या मतदाराच्याजवळ गेले. ‘तुम्ही माझ्या अंगाला हात लावू शकत नाही’, असे त्याने सांगताच पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा हात धरला.