नववीपर्यंतच शिक्षण झालेले उमेदवार सर्वच पक्षात 

उच्च शिक्षित उमेदवार देण्याची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्षात उमेदवारांना तिकिटे देताना शिक्षण हा मुद्दा महापालिका निवडणुकीत बाजूलाच ठेवलेला दिसत आहे. सर्वच पक्षांच्या बहुसंख्य उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतही झालेले नाही. कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद नसून काही उमेदवारांची शाळेशी ओळखच झालेली नाही, तर नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या उमेदवार सर्वच पक्षांमध्ये बहुसंख्येने आहेत.

उमेदवार शिकलेले असावेत, त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसावी असे सगळे मुद्दे निवडणुकीच्या आधी चर्चेत असतात. या चर्चामध्ये सर्वच पक्षांचे नेते अगदी आघाडीवर असतात. मात्र प्रत्यक्षात उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देताना त्यांचे शिक्षण हा मुद्दा गौणच मानला गेल्याचे दिसत आहे. सध्या शहरात निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाचही पक्षांच्या उमेदवारांच्या शिक्षणाचा त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवरून आढावा घेतला असता पक्षांनी दिलेल्या उमेदवारांमधील पन्नास टक्के उमेदवारांचे पदवी किंवा बारावीनंतरच्या एखाद्या पदविकेपर्यंतही शिक्षण झालेले नाही. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एक हजार ९० उमेदवारांपैकी साधारण ८२० उमेदवार हे प्रमुख राजकीय पक्षांचे  आहेत.

मात्र यापैकी पन्नास टक्के उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतही झालेले नाही. पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपैकी साधारण २०० उमेदवारच किमान पदवी किंवा पदविका घेतलेले आहेत. बहुतेक उमेदवारांचे शिक्षण हे नववीपर्यंतच झालेले आहे. त्यामध्येही जवळपास पन्नास टक्के उमेदवार हे पाचवीपर्यंतच शिकलेले आहेत. कमी शिकलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मनसेच्या ऊर्मिला बनकर, काँग्रेसच्या नूरजहाँ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या परविन शेख या उमेदवार शाळेतच गेल्या नसल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून समोर येत आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये तर अगदी दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांचेही प्रमाण अत्यल्प आहे. प्रतिज्ञापत्रात नववी पर्यंतच शिक्षण झाल्याचा उल्लेख उमेदवारांनी केला आहे.

उच्चशिक्षित उमेदवारही

एकीकडे दहावीपर्यंतचेही शिक्षण पूर्ण न केलेले उमेदवार मोठय़ा संख्येने असल्याचे चित्र दिसत आहे, मात्र त्याचवेळी पदव्युत्तर पदवी घेतलेले, डॉक्टर, अभियंता, वकील असे उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. असे ८० उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रांजली थरकुडे, सिद्धार्थ धेंडे, अस्मिता साळवे, श्रद्धा प्रभुणे हे उमेदवार डॉक्टर आहेत. पदवी घेतलेल्यांपेकी बहुतेक उमेदवारांची विधी शाखेची किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी आहे. सचिन पुणेकर हे उमेदवार बॉटनी विषयातील पीएच.डी धारक आहेत.

Story img Loader