पुणे : महापालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले साफ करण्यात येतात. मात्र, यंदा नालेसफाईच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब झाल्याने नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे.

दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात नालेसफाईच्या निविदा काढल्या जातात. मात्र, यंदा या निविदा काढण्यास मार्च महिना उजाडल्याने नालेसफाईला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये नालेसफाईअभावी पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाले, ओढे, तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेतले जाते. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात पावसाळ्यामध्ये या कामावर ‘पाणी’ फिरते. नाल्यांची योग्य पद्धतीने सफाई होत नसल्याने पावसाळ्यामध्ये अनेक भागांतील नाले, पावसाळी गटारे तुंबल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या वर्षी शहरातील सर्व पावसाळी गटारे आणि नाल्यांची स्वच्छता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही नाल्यांची सफाई वेळेवर करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले नव्हते.

महापालिकेच्या वतीने नालेसफाईची निविदा प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात राबवून मार्च महिन्यात संबंधित ठेकेदाराला प्रत्यक्ष काम दिले जाते. त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक असलेली नालेसफाईची संपूर्ण कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. यंदा फेब्रुवारी महिन्यात नालेसफाईच्या निविदा काढणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नालेसफाईच्या कामांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला सुरुवात होण्यासाठी विलंब होणार आहे.

सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी प्रत्येकी एक, अशा ३० निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याचे काम संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असून, काही भागांत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पावसाळी वाहिन्या नसल्याने या गावांमधील नालेसफाईसाठी महापालिकेकडून आठ निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

‘कामे सात जूनपर्यंत पूर्ण करा’

शहरातील नालेसफाई, मलवाहिन्यांची, तसेच पावसाळी गटारांची कामे सात जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गेल्या आठवड्यात विभागप्रमुखांना दिल्या आहेत. महापालिकेचे सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे व संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रो, पुणेरी मेट्रो, महावितरण यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाणी साचणारी ११६ ठिकाणे

दर वर्षी पावसाळ्यामध्ये शहरातील ज्या भागांत नेहमी पाणी साचते, अशा ११६ ठिकाणांची (क्रॉनिक स्पॉट्स) यादी महापालिकेने केली आहे. त्यांची स्वच्छता करण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. क्षेत्रीय अधिकारी व परिमंडळ अधिकाऱ्यांना या कामांवर नियमित लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

अशी होणार नालेसफाई

– शहरातील ९० किलोमीटर लांबीच्या नाल्यांची प्राधान्यक्रमाने सफाई

– १२५ पावसाळी वाहिन्या

– समाविष्ट गावांमधील १२३ पाणी साचणारी ठिकाणे

– विविध नाल्यांवरील १८९ ठिकाणची अतिक्रमणे काढणार

– नालेसफाई, पावसाळी गटारांच्या सफाईसाठी ३० निविदांना मान्यता