महापालिकेच्या आरोग्य विभागातील नोकऱ्यांसाठी उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा शोध आता सुरू झाला आहे. महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू असतानाच काही जणांनी बनावट भरतीची समांतर प्रक्रिया राबवली असे या प्रकरणात दिसून आले असून या प्रकरणात नक्की कोणाचा सहभाग आहे त्याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील परिचारिका व अन्य पदांसाठी भरती सुरू असताना काही जणांनी बनावट पद्धतीने भरतीची समांतर प्रक्रिया राबवली आणि इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली. रक्कम गोळा केल्यानंतर या सर्वाना गंडा घालण्यात आला. या प्रकरणात पन्नास ते साठ जणांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात उमेदवारांना अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची व शिक्का असलेली नियुक्तीची बनावट पत्रही देण्यात आली असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर या प्रकरणात महापालिकेतील काही कर्मचारीही सामील असल्याचे काही जणांनी सांगितले आहे.
महापालिकेने जी भरती प्रक्रिया राबवली, त्यात निवड झालेले उमेदवार भरती झालेले आहेत. मात्र, ती प्रक्रिया सुरू असताना बनावट भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्याचा महापालिकेशी काहीही संबंध नाही. याबाबत आता पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहे. त्या तपासाला महापालिकेचे सहकार्य राहील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
समांतर भरती प्रक्रिया राबवून नोकरभरतीत गंडा घालण्याचा प्रकार
महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू असतानाच काही जणांनी बनावट भरतीची समांतर प्रक्रिया राबवली असे या प्रकरणात दिसून आले असून या प्रकरणात नक्की कोणाचा सहभाग आहे त्याची चर्चा सुरू झाली आहे.
First published on: 01-07-2014 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc fake recruitment crime forger