पुणे : औंध येथील परिहार चौकाजवळ बेकायदा ३० गाळे कसे उभे राहिले, याची चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे.

औंध येथील परिहार चौकाजवळ असलेल्या पदपथावर महापालिकेने २००२ मध्ये शिवदत्त मित्र मंडळाला भाजी मंडईसाठी जागा दिली होती. त्याबाबतचा करार २०१३ मध्ये संपुष्टात आला. परंतु, प्रत्यक्षात तेथे ३० टपऱ्या उभारल्या गेल्या आहेत. पालिकेबरोबर झालेला करार संपल्यानंतर या ठिकाणी बांधकाम करून हे गाळे उभारले गेले आहेत.

हेही वाचा >>> साधू वासवानी पुलाचे काम कधी पूर्ण होणार, आयुक्तांनी केला मोठा खुलासा

औंध परिसर वर्दळीचा असतानाही या प्रकारामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने या भागातील माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती मधुकर मुसळे यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते.

या प्रकाराची दखल घेत आयुक्त भोसले यांनी याची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या चौकशीमध्ये हे सर्व गाळे बेकायसदा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आयुक्तांनी ते पाडून टाकण्याचा आदेश दिला. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई करत हे गाळे पाडून पदपथ रिकामा केला. याबाबतची सविस्तर चौकशी करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

हेही वाचा >>> बोपदेव देव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची खबऱ्यांवर भिस्त, पोलीस आयुक्तालयात बैठक

पालिकेचा करार संपल्यानंतर शिवदत्त मिनी मार्केट येथील स्टॉलधारकांना देण्यात आलेल्या सर्व अतिक्रमण परवान्यांची सखोल चौकशी करून त्याची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समिती स्थापन करावी. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. पालिकेकडे आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या समितीने सर्व कागदपत्रांची छाननी करून, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून पूरक अहवाल तातडीने सादर करावा असे आयुक्त डॉ. भोसले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

बेकायदा गाळे बांधण्यात कोणाचा हात?

महापालिका आयुक्तांनी या बेकायदा गाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश काढल्याने अतिक्रमण विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. हे बेकायदा गाळे उभरण्यामागे कोणाचा हात आहे. करार संपल्यानंतर देखील हे गाळे उभारून याचा आर्थिक मलिदा कोणी खाल्ला याचा उलगडा यामधून होणार आहे.