शहरातील नाल्यांचा विषय दरवर्षी गाजत असताना नाल्यांमध्ये बांधकामांसाठी तसेच नाले वळवण्यासाठी महापालिकेनेच परवानगी दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, नाले वळवण्यासाठी परवानगी दिल्याचे महापालिकेनेही माहिती अधिकारात मान्य केले आहे.
नाले अडवणे, नाले वळवणे, नाल्यांमधील बांधकामे हे प्रकार दर पावसाळ्यात चर्चेत येतात. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या अडथळ्यांमुळे नाल्यांना पूरही येतो. अशा अनेक प्रकारांना महापालिकाच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख बाळा शेडगे यांनी बुधवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. शहरप्रमुख प्रकाश ढोरे, नगरसेविका पुष्पा कनोजिया यांचीही यावेळी उपस्थिती होती. शहरातील किती नाल्यांमध्ये नाले वळवून बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, याची माहिती मनसेचे नगरसेवक अजय तायडे यांनी माहिती अधिकारात मागवली होती. ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना गेले तीन महिने प्रयत्न करावे लागले. महापालिकेने शहरातील २८ ठिकाणी बांधकाम परवानगी देताना नाले वळवायला किंवा नाल्याची प्रवाह रेषा बदलायला परवानगी दिल्याचे, या माहितीतून स्पष्ट झाल्याचे शेडगे यांनी सांगितले.
नैसर्गिक नाले वळवून त्यात बांधकाम परवानगी देण्याचे कारण काय आणि या परवानग्या कोणी दिल्या, असे प्रश्न मनसेने उपस्थित केले असून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नाल्यांमध्ये सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवावीत, अशीही मागणी मनसेने केली आहे.
या माहितीबरोबरच शहरातील अनेक भाग असे आहेत की, तेथील अधिकाऱ्यांनी नाले वळवण्याचा एकही प्रकार त्यांच्या भागात झालेला नाही अशी माहिती दिली आहे. या माहितीलाही मनसेने आक्षेप घेतला आहे. येरवडा, लोहगाव, संगमवाडी, शिवाजीनगर, शहरातील सर्व पेठा, औंध, बोपोडी, कोथरूड, एरंडवणे, वारजे, शिवणे, हिंगणे खुर्द, वडगाव खुर्द, बिबवेवाडी, गुलटेकडी, मार्केट यार्ड, वानवडी, कोंढवा या भागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, या भागांमध्येही नाल्यांमध्ये बांधकाम परवानगी दिल्या असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

Story img Loader