पुणे : हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केले जाणार आहे. यात्रेकरूंना मेंदूज्वर (मेनिन्जायटिस), इन्फ्लुएन्झा आणि पोलिओ या लसी दिल्या जाणार आहेत. शहरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या सुमारे दीड हजार जणांचे २६ एप्रिलला आझम कॅम्पस येथे लसीकरण होणार आहे.
राज्य कुटुंब व कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांनी हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आणि लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. यात्रेकरूंना देण्यात आलेल्या लशीची नोंद हज यात्रेसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि हज प्रशिक्षकांमार्फत उपलब्ध करून दिले जाणारे हेल्थ कार्ड अथवा लसीकरण प्रमाणपत्र यावर करावी लागणार आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार, हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कमला नेहरू रुग्णालयात करण्यात आली. त्यात रक्त चाचण्या, ईसीजी आणि इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत. हज कमिटीच्या अधिकृत यादीत असलेल्या यात्रेकरूंची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
हज यात्रा सुरू होण्याआधी किमान २ आठवडे आधी लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने २६ एप्रिलला आझम कॅम्पसमधील युनानी हॉस्पिटलमध्ये हे लसीकरण आयोजित केले आहे. आरोग्य विभागाकडून ३ वर्षांवरील यात्रेकरूंना मेंदूज्वर लस दिली जाणार आहे. याचबरोबर इन्फ्लुएन्झा ही लस ६५ वर्षांवरील आणि सहव्याधिग्रस्त यात्रेकरूंना दिली जाईल. तसेच, सर्व यात्रेकरूंना तोंडावाटे पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. यात्रेकरूंना लसीकरणानंतर याबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
विमानतळावरही आरोग्य तपासणी
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची विमानतळावरही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या तपासणीत आजारी यात्रेकरू आढळल्यास त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.