पुणे : महापालिकेची परवानगी न घेता रस्त्यावरच गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल टाकणाऱ्या शहरातील २२९ विक्रेत्यांना पालिकेने नोटीस दिली आहे. ठरवून दिलेल्या मान्यतेपेक्षा अधिक आकाराचे मंडप टाकल्याने पालिकेने तीन मंडळांनादेखील नोटीस दिली आहे. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ही मंडळे आहेत.
पादचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच पदपथ अडवून स्टॉल टाकू नये, अशा सूचना पालिकेने केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत शहरातील विविध भागात नागरिकांना चालण्यासाठी त्रास होईल, अशा पद्धतीने गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेकडे आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने पालिकेने या विक्रेत्यांना नोटीस बजाविली आहे.
हे ही वाचा…पुणे : पालिकेने नऊ दिवसांत बुजविले ४९९ खड्डे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलमपट्टी
सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पुणेकरांकडून मूर्तींचे बुकिंंग केले जात आहे. अखेरच्या दोन दिवसांमध्ये स्टॉलवर मूर्ती खरेदीसाठी गर्दी उसळते. मूर्ती विक्रीचे स्टॉल मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक विक्रेत्यांनी स्टॉल पदपथावरच लावल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. पालिकेची मान्यता न घेता हे स्टॉल लावण्यात आले आहेत. पालिकेची मान्यता न घेता आणि पदपथावर स्टॉल लावून मूर्तीची विक्री करणाऱ्या शहरातील २२९ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
वाहतुकीला अडथळा आणणारे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४ नोटीस सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने दिल्या आहेत. मंडळाचा मांडव मोठा घातल्याने तीन मंडळांना नोटीस बजावली आहे. त्यांनाही पालिकेने परवानगीनुसार मांडव उभारण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा…पुण्यात डेंग्यूसोबत चिकुनगुन्याचा ‘ताप’! रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आरोग्य विभाग धास्तावला
पालिकेची मान्यता न घेता स्टॉल उभारल्याने २२९ जणांना पालिकेने नोटीस बजावत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. – सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग
क्षेत्रीय कार्यालय – बजाविलेल्या नोटीस
सिंहगड रस्ता- ३४
औंध बाणेर – २९
बिबवेवाडी – २५
धनकवडी सहकारनगर -२४
येरवडा कळस- २१
कसबा विश्रामबाग -१८
शिवाजीनगर घोले रस्ता – १२
नगर रस्ता – ९
कोथरूड बावधन- ८
भवानी पेठ -८
वारजे कर्वेनगर – ७
ढोले पाटील – ३
वानवडी रामटेकडी – १
कोंढवा येवलेवाडी – ०
© The Indian Express (P) Ltd