बेकायदा जाहिरात फलक, फ्लेक्स आणि होर्डिग्जना शहरात मनाई असली आणि अशा फलकांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असले, तरी महापालिकेनेच बेकायदेशीर फलक उभारले तर काय करायचे आणि आता अशा प्रकरणात नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेतर्फे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान महापौर चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ डिसेंबर) होईल. या स्पर्धेची जाहिरातबाजी खुद्द महापालिकेनेच बेकायदा फ्लेक्स लावून सुरू केली आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये स्पर्धेची माहिती देणारे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत आणि सौजन्य म्हणून त्या फलकांवर स्थानिक मंडळांची नावे छापण्यात आली आहेत.
या प्रकारावर कडी करत खंडुजीबाबा चौकात असलेल्या एका जाहिरात व्यावसायिकाच्या अधिकृत फलकावर महापालिकेने तब्बल ८०० चौरस फुटांचा भव्य फ्लेक्स विनापरवाना लावला आहे. सर्वसामान्य नागरिकांना, जाहिरात व्यावसायिकांना वा होर्डिग व्यावसायिकांना अशा प्रकारच्या फलकावर जाहिरात करायची असेल, तर प्रति चौरस फूट २२२ रुपये या दराने त्यांच्याकडून शुल्क आकारले जाते. महापालिकेने अतिक्रमण करून जो जाहिरात फलक उभारला आहे, त्याचे शुल्क एक लाख ७७ हजार रुपये इतके आहे. मात्र, फलक लावण्याबाबत संबंधित मालकाला कोणतीही पूर्वसूचना न देता वा त्यांची परवानगी न घेता महापालिकेने हा फलक उभारला आहे.
खंडुजीबाबा चौकात पीएमसी/पीएचआर/८/१ असा परवाना क्रमांक असलेला जो जाहिरात व्यावसायिकाचा फलक उभा आहे, त्याच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर चंचला कोद्रे, आयुक्त महेश पाठक यांची छायाचित्र असलेला व स्पर्धेची जाहिरात करणारा फलक बिनदिक्कतपणे उभारण्यात आल्याचे चित्र आहे. महापालिकेनेच उभारलेल्या या बेकायदेशीर फलकाबाबत आता कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्न होर्डिग व जाहिरात व्यावसायिकांना पडला आहे.
नेतेमंडळींकडून असे प्रकार नेहमीच
जाहिरात व्यावसायिकांच्या अधिकृत फलकांवर फ्लेक्स लावण्याचे प्रकार राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांकडून नेहमीच होतात. त्याबाबत काही विचारणाही करता येत नाही. विचारल्यास दादागिरीचीच भाषा वापरली जाते. कार्यकर्त्यांकडूनही असेच अनुभव येतात. अनेकदा आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली जाते. अशा वेळी महापालिकेचे अधिकारी देखील बेकायदा फलकांवर कोणतीही कारवाई करत नाहीत.
– बाळासाहेब गांजवे
अध्यक्ष, पुणे आउटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन

Story img Loader