कमला नेहरू रुग्णालयातील लिफ्ट कोसळून पाच जण जखमी होण्याच्या घटनेनंतर महापालिकेला लिफ्टच्या सुरक्षिततेबद्दल जाग आली असली, तरी महापालिकेच्या ३६ लिफ्टची तपासणी नियमितपणे होत नाही, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. महापालिकेच्या विविध इमारतींमधील तसेच रुग्णालयांमधील लिफ्टची तपासणी कधी होते, तर कधी होत नाही अशी परिस्थिती आहे.
महापालिका रुग्णालयातील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातानंतर प्रथम रुग्णालयांमधील आणि त्यानंतर महापालिकेच्या सर्वच इमारतींमधील लिफ्टची सुरक्षाविषयक तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला. मात्र, एवढा मोठा अपघात घडूनही महापालिका प्रशासनाच्या स्तरावर लिफ्ट सुरक्षिततेबाबत अन्य कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अपघात झालेल्या लिफ्टसंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोपर्यंत अहवाल येणार नाही, तोपर्यंत ही लिफ्ट चालू केली जाणार नाही, असे तांत्रिक विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी बुधवारी सांगितले.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की संबंधित लिफ्टचा प्राथमिक तपासणी अहवाल आम्ही यापूर्वीच महापालिकेला दिलेला आहे आणि येत्या आठ दिवसांत सविस्तर अहवालही दिला जाईल. शहरातील सर्वच लिफ्टची सुरक्षितता विषयक तपासणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे लिफ्ट निरीक्षक करतात. या विभागाचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. या कार्यालयातून निरीक्षकांना लिफ्ट तपासणीसंबंधीची माहिती दिली जाते. तपासणीत लिफ्टमध्ये आढळलेले दोष दूर करण्याबाबत सूचना संबंधितांना केल्या जातात. मात्र, त्यानुसार अंमलबजावणी करून दोष दूर करण्याचे काम मालक वा संबंधित कार्यालयाने करायचे असते, असेही सांगण्यात आले.
महापालिकेच्या लिफ्टतपासणीबाबत सूत्रांनी सांगितले, की महापालिकेच्या जेवढय़ा इमारती शहरात आहेत तसेच जेवढी कार्यालये आहेत. त्यातील लिफ्टची नियमित तपासणी होत नाही. कधी तपासणी होते, कधी होत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये सतरा, तर एकूण छत्तीस लिफ्ट आहेत.
शहरात तेवीस हजार लिफ्ट
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिफ्ट निरीक्षकांकडून शहरातील लिफ्टची वार्षिक तपासणी होते. त्यांच्याकडील नोंदीनुसार शहरात तेवीस हजार लिफ्ट आहेत आणि सत्तावीस निरीक्षक आहेत. एक निरीक्षक रोज तीन, तर महिन्याला शंभर लिफ्टची तपासणी करतो. त्यांच्या अहवालानुसार लिफ्टमधील दोष दूर करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची असते. महापालिकेकडील ताज्या नोंदीनुसार शहरात सात लाख चाळीस हजार मिळकतींची नोंद झाली आहे. नवी बांधकामेही मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे शहरातील लिफ्टची संख्या तेवीस हजारांहून अधिक असावी, असा अंदाज व्यक्त झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा