महापालिकेची विविध कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून महापालिकेची लूट सुरू असल्याचा नगरसेवकांनी केलेला आरोप अखेर खरा ठरला आहे. या आरोपासंबंधी अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पाच क्षेत्रीय कार्यालयांमधील एका ठेकेदाराच्या कामांची तपासणी केली असता मोठा गैरप्रकार उघड झाला असून चौकशी अहवालानुसार संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले जातील, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत दिली.
महापालिकेसाठी कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून खोटी कामे दाखवणे, खोटी बिले तयार करणे यासह अनेक गैरप्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार नगरसेवक अविनाश बागवे यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. या प्रकारांची चौकशी केली, तर मोठे गैरप्रकार बाहेर येतील, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कोंढवा, धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगर आणि टिळक रस्ता या पाच क्षेत्रीय कार्यालयांनी गेल्या दोन वर्षांत करून घेतलेल्या एकूण दोनशे कामांपैकी काही कामांची नमुना म्हणून तपासणी केली. या पाहणीत अनेक गैरप्रकार उघड झाले असून तसा अहवाल बकोरिया यांनी आयुक्तांना सादर केला आहे.
सर्वसाधारण सभेत बुधवारी हा मुद्दा बागवे यांनी उपस्थित केला. नमुना म्हणून काही प्रकरणे तपासली, तर एवढा घोटाळा बाहेर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जी कामे झाल्याचे दाखवले आहे, त्यातील साठ प्रकरणे सापडलेलीच नाहीत. तसेच दोन वर्षांत झालेल्या पंधरा कोटींच्या कामांपैकी त्यातील सव्वीस टक्के कामे एकाच ठेकेदाराने केल्याचे उघड झाले आहे. ज्या कामांचे पैसे दिले गेले ते रस्ते खराब झाले असून रस्त्यांना भेगा पडल्या आहेत, ठेकेदारांबरोबर करार न करताच त्यांना कामे देण्यात आली आहेत, बिले देण्यात आलेल्या कामांची संख्या मोठी असली, तरी जागेवर कामे नाहीत, असे प्रकार चौकशीत आढळल्याची माहिती बागवे यांनी या वेळी दिली.
ज्या वाहनाची माल वाहण्याची क्षमता सहा टन आहे, त्या वाहनातून वीस टन माल आल्याचे दाखवून तेवढे पैसे देण्यात आले आहेत, असेही बागवे यांनी या वेळी सांगितले. याबाबत कारवाई सुरू करा, असेही बकोरिया यांनी अहवालात नमूद केले असले, तरी कारवाई का होत नाही, असा प्रश्न बागवे यांनी सभेत उपस्थित केला. हा अहवाल तयार करणाऱ्या बकोरिया यांची बदली करून टाकू असा दम ठेकेदार देत असल्याचेही बागवे यांनी सांगितले. या विषयावर निवेदन करताना आयुक्त म्हणाले, की अहवालातील मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांची मी शहानिशा करतो आणि योग्य त्या कारवाईचे आदेश देतो.

Story img Loader