पक्षाने दिलेल्या आदेशानुसार पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. गेले दोन महिने नव्या महापौरांबाबत चर्चा सुरू होती. अखेर ती चर्चा मंगळवारी धनकवडे यांच्या राजीनाम्यामुळे थांबली असून आता पक्ष उर्वरित वर्षभरासाठी कोणाला संधी देणार याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सन २०१२ मध्ये झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित होते. त्या आरक्षणानुसार वैशाली बनकर, चंचला कोद्रे यांना महापौरपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुरुषांच्या खुल्या वर्गासाठी महापौरपद खुले झाल्याने दत्तात्रय धनकवडे यांना संधी देण्यात आली. धनकवडे यांची मुदत अडीच वर्षांची होती. मात्र पक्षाने त्यांना सव्वा वर्षांची मुदत दिली होती. ती मुदत १५ डिसेंबर रोजी पूर्ण झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त २० डिसेंबर रोजी पुण्यात राष्ट्रवादीने ‘कृतज्ञता सोहळा’ आयोजित केला होता. त्यामुळे महापौर बदलाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. पक्षाचे नेते अजित पवार यांनी दत्तात्रय धनकवडे यांना राजीनामा देण्याबाबत सोमवारी रात्री उशिरा सूचना केली. त्यानुसार धनकवडे यांनी मंगळवारी आयुक्त कुणाल कुमार, नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे राजीनामा सादर केला.
दत्तात्रय धनकवडे महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर होताच पक्षातील अनेक इच्छुक लगेचच तयारीला लागले. महापौरपदासाठी माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी सभागृहनेता सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके, विकास दांगट, प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे, चेतन तुपे अशा अनेक नावांची चर्चा महापालिकेत सुरू असून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. दत्तात्रय धनकवडे यांची महापौरपदाची सव्वा वर्षांची मुदत १५ डिसेंबर रोजी पूर्ण झाली. नवीन महापौरांची निवड होईतोपर्यंत धनकवडे हेच महापौरपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
महापौरांची निवड महिना अखेर
दत्तात्रय धनकवडे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवावी लागेल. सभा बोलविण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर विभागीय आयुक्तांची वेळ घेऊन महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेस किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागेल, असे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.
उपमहापौरही बदलणार
महापौरांबरोबरच उपमहापौरही बदलण्यात येतील असे काँग्रेसने जाहीर केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार उपमहापौर आबा बागूल यांनाही त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बरोबरच होईल, असे काँग्रेसचे शहाराध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितले.
कामाबाबत समाधानी- दत्तात्रय धनकवडे
महापौरपदाच्या माझ्या कारकिर्दीत शहरात मोठय़ा प्रमाणात विकास कामे करण्यात आली. या कामांबाबत आणि कारकिर्दीबाबत समाधानी असल्याचे दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नदी सुधार प्रकल्प, पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश, मुंढवा जॅकवेल, संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्ग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील बहुमजली उड्डाण पूल, स्वारगेट येथील एक उड्डाण पूल, शहर सुशोभीकरणाअंतर्गत रस्ते दुभाजक, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा नियोजित प्रकल्प अशी अनेक कामे कार्यकाळात झाली. शहराच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला पुणे मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील सातत्याने प्रयत्न केले. पुणे मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असेही धनकवडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेता अरिवद िशदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, सभागृहनेता शंकर केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, चंचला कोंद्रे, वैशाली बनकर, मोहनसिंग राजपाल आदी यावेळी उपस्थित होते.
अद्याप राजीनाम्याचा आदेश नाही
– िपपरीच्या महापौरांची स्पष्टोक्ती
पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी राजीनामा दिला असला तरी आपल्याला अद्याप तसा आदेश मिळाला नाही, श्रेष्ठींचा निर्णय मान्य राहील, असे िपपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
निर्धारित सव्वा वर्षांचा कालावधी संपल्याने पुण्याच्या महापौरांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्याच पध्दतीने, धराडे यांचीही मुदत संपलेली आहे. धराडे यांना हटवून दिघीच्या नगरसेविका आशा सुपे यांना महापौरपद देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या ३२ नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्यामुळे धनकवडे यांच्या पाठोपाठ धराडे राजीनामा देणार का, याविषयी चर्चा होती. तथापि, आपल्याला तसे आदेश नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापौरांचा राजीनामा हा स्थानिक नेत्यांचा विषय नाही, असे सांगून पक्षनेत्या मंगला कदम यांनी अजितदादांच्या आदेशानंतर तशी कार्यवाही होईल, असे स्पष्ट केले.
स्थायीसाठी इच्छुकांच्या उडय़ा
स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागवले, तेव्हा तब्बल ४५ नगरसेवकांनी स्थायी समितीत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महापौर, उपमहापौर तसेच विविध विषयांचे सभापतिपद भूषवलेल्या नगरसेवकांनी ‘जाता-जाता’ स्थायीच्या माध्यमातून ‘धनलाभ’ व्हावा, या हेतूने त्याच समितीचा आग्रह धरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा